Breaking News

मुंबईत स्वबळावरच लढणार!

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे जगताप ठाम

मुंबई ः प्रतिनिधी – मुंबई महापालिका निवडणुकीला अजून दोन वर्षांचा अवधी असला तरी राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सर्वच पक्षांनी आतापासूनच या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीसोबत सत्तेत असला तरी मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे येथे स्वबळावर निवडणुका लढण्याचा विचार आम्ही का करू नये, असा सवाल करीत मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांनी आपला स्वबळाचा निर्धार कायम ठेवला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी सोमवारी पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. या वेळी आगामी निवडणुकीत मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकावण्याचा निर्धार भाई जगताप यांच्यासह काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी बोलून दाखवला.

मुंबई काँग्रेसच्या वतीने ’माझी मुंबई, माझी काँग्रेस’ हा नारा देण्यात आला आहे. त्यावर बोट ठेवत स्वबळावर लढण्याबाबत जगताप यांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली. इतरांप्रमाणे आम्हालाही आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यातूनच आम्ही स्वबळावर निवडणुका लढण्याचा विचार करीत असून आम्ही प्रत्येक सामान्य मुंबईकरापर्यंत पोहचणार आहोत व त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत, असे जगताप यांनी सांगितले. दरम्यान, मागील कित्येक वर्षांपासून ताब्यात असणार्‍या मुंबई पालिकेवर तिरंगा फडकावण्याचा निर्धार भाई जगताप यांच्यासह काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी बोलून दाखविल्यामुळे शिवसेनेची अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. त्यातून सरकारमधील या दोन पक्षांत कलगीतुरा रंगणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Check Also

भव्य कटआऊट्स; चित्रपटाचं मोठेपण त्यातही

आज सगळीकडेच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ची जबरदस्त क्रेझ आहे. चित्रपट शौकिनांपासून इतिहासाचे अभ्यासक आपापल्या पद्धतीनुसार …

Leave a Reply