Breaking News

ताम्हाणी घाटात दरडीचा दगड एसटी बसवर कोसळला

माणगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गोरेगाव-माजलगाव एसटी बसवर ताम्हाणी घाटात कोंडेथर गावाच्या हद्दीत दरडीचा मोठा दगड पडल्याची घटना सोमवारी (दि. 18) सकाळी घडली. या दगडाचे तुकडे चालकाच्या समोरील काचेवर व उजव्या बाजूकडील प्रवासी काचेवर पडून नुकसान झाले. या बसमधून चालक-वाहक आणि 33 प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने यापैकी कोणालाही दुखापत झाली नाही.
माणगाव बस आगाराची गोरेगाव-पुणे-माजलगाव बस (एमएच 20 बीएल 1167) सोमवारी 33 प्रवासी घेऊन सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास कोंडेथर गावाच्या हद्दीतून जात असताना ताम्हिणी घाटात रस्त्याकडेला असणार्‍या दरडीच्या दगडाचे तुकडे अचानक चालकाच्या समोरील काचेवर व उजव्या बाजूकडील प्रवासी काचेवर आदळले.
आंतरराष्ट्रीय दिघी बंदराशी जोडणार्‍या माणगाव-ताम्हाणी-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटाच्या संरक्षक भिंती धोकादायक झाल्या आहेत तसेच या मार्गालगत उंच डोंगर असल्याने दरडी कोसळण्याची भीती प्रवासीवर्गातून होत असून प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे. अशातच सोमवारी दुर्घटना होता होता वाचली. या घटनेची माहिती समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेबाबत बसचालक राजाभाऊ शिंगटे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात खबर दिली.
दरम्यान, ताम्हिणी घाटातील स्ता अपघाताला निमंत्रण देत आहे. या मार्गावर कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून कमकुवत कठडे व धोकादायक वळणे यांना संरक्षण भिंत उभारणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवासी व पर्यटकातून होत आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply