केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोना लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याबाबत शुक्रवारी (दि. 1) दिल्लीत तज्ज्ञांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कोविशिल्ड लशीला तातडीच्या वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. लशीला मान्यता देण्यात आल्याने आता लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशवासीयांना आनंदाची बातमी मिळाली आहे. जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोरोना लशीला आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आली. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेका यांनी तयार केलेल्या कोविशिल्ड लसीचा वापर भारतात सुरू होईल. तशी परवानगी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाच्या विशेष समितीने घेतली. ब्रिटिश सरकारने काही दिवसांपूर्वीच ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेका लशीच्या वापरास परवानगी दिली आहे.
ब्रिटन हा ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाच्या कोरोना लशीला परवानगी देणारा पहिला देश ठरला. ब्रिटनने याच आठवड्यात ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेका लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली. त्यामुळे भारतातही ऑक्सफर्डच्या लसीला परवानगी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. ऑक्सफर्डने लशीच्या उत्पादनासाठी भारतीय कंपनी सीरमशी करार केला आहे. सीरमने आतापर्यंत लशीचे पाच कोटी डोस तयार केले आहेत. भारतात ही लस कोविशिल्ड नावाने उपलब्ध होईल.
भारतासारख्या खंडप्राय देशासाठी कोरोना लशींचे उत्पादन व वितरण आव्हानात्मक आहे. यात सीरम महत्त्वाची भूमिका बजावेल. ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाने लशीच्या उत्पादनासाठी सीरमसोबत करार केला. पुण्यातील सीरम जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी आहे. भारतातच लशींचे उत्पादन होत असल्याने वितरण जास्त सुलभ होईल.
लस साठवण्यास सोपी
कोरोना लस विशिष्ट तापमानात ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा तिची परिणामकारकता कमी होते. सीरमच्या कोविशिल्डसोबत फायझर व मॉडर्नाच्या लशी स्पर्धेत होत्या, मात्र फायझरची लस उणे 70 अंश सेल्सिअस तापमानात, तर मॉडर्नाची लस साठवण्यासाठी डीप फ्रीजरची आवश्यकता असते. ऑक्सफर्डची लस मात्र सामान्य फ्रीजमध्येही ठेवता येऊ शकते.
उद्यापासून देशातील प्रत्येक राज्यात ’ड्राय रन’
देशातील प्रत्येक राज्यात 2 जानेवारीपासून ’ड्राय रन’ करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या तयारीचा आढावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत एका बैठकीत घेण्यात आला. याआधी पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाचे ’ड्राय रन’ यशस्वीरीत्या घेण्यात आले आहे.