Breaking News

24 महसुली गावांतील गावठाण क्षेत्राचे होणार नगर भूमापन

  • आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश
  • पनवेल मनपा हद्दीतील रहिवाशांना दिलासा

पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल नगरपालिका हद्दीतील 24 महसुली गावांत गावठाण क्षेत्राची मोजणी करणे व भूमापन क्रमांक देऊन भूखंडाचा नकाशा व मालकी हक्क दस्तावेज तयार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या संदर्भातील अध्यादेश शासनाकडून शुक्रवारी
(दि. 1) काढण्यात आला आहे. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागणी व सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार हा अध्यादेश जारी झाला आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील समाविष्ट गावातील गावठाण क्षेत्राचे नगर भूमापन करण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेच्या स्थापनेपासून शासनाकडे केलेल्या मागणीत म्हटले होते की, 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 30 महसुली गावांतील गावठाण क्षेत्राचे सर्वेक्षण करून त्याचे नकाशे तयार करणे व जनतेस अधिकार अभिलेख प्रदान करण्याच्या कामाबाबत महानगरपालिकेने भूमी अभिलेख संचालक, पुणे यांच्याशी संपर्क साधला होता. या कामाचे स्वरूप, त्यासाठी आवश्यक कर्मचारी वृंद व खर्चाचे अंदाजपत्रक याबाबतचा सविस्तर अहवाल भूमी अभिलेख संचालकांनी 30 जानेवारी 2019 रोजी महसूल विभागास सादर केला आहे.
या मोजणी कामासाठी एक कोटी 90 लाख 50 हजार 235 रुपये प्रस्तावित खर्चाची तरतूददेखील महानगरपालिकेने केली आहे. महानगरपालिका स्थापनेनंतर पालिका हद्दीत समाविष्ट गावांचा व गावठाणाचा विकास योजना आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. समाविष्ट झालेल्या महसुली गावांच्या गावठाणातील घरे जुन्या पद्धतीची असून त्यांचे आयुर्मान कमी आहे. अशा घरांच्या पुनर्बांधणीबाबत आपल्याकडून अर्ज प्राप्त होत आहेत, तथापि पुरेशा कागदपत्रांअभावी पुनर्बांधणी परवानगी देणे महापालिका प्रशासनास अडचणीचे झाले आहे. तसेच मोडकळीस आलेली घरे कोसळून जीवितहानी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे महानगरपालिकेची सर्वेक्षणाची मागणी योग्य असून ती युद्धपातळीवर पूर्ण करण्याची गरज असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले.
तसेच निधीची उपलब्धता करूनही महसूल खात्याकडून या बाबींकडे गांभीर्याने लक्ष पुरविले जात नसल्याचे दिसून येत असल्याने सुमारे दोन वर्षांचा कालावधी उलटूनही सर्वेक्षणाच्या कामास महसूल विभागाकडून मंजुरी दिली जात नाही ही खेदाची बाब आहे, असे नमूद करून पनवेल महानगरपालिका हद्दीतील महसुली गावांच्या गावठाणाचे सर्वेक्षण सुरू करण्याच्या दृष्टीने तातडीची कारवाई करावी व तशा सूचना संबंधितांना द्याव्यात, अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती.
त्यानुसार पनवेल महानगरपालिका हद्दीतील देवीचापाडा, चाळ, घोट, कळंबोली, रोडपाली, पडघे, पालेखुर्द, ढोंगर्‍याचा पाडा, टेंभोडे, बीड, आडिवली, रोहिंजण, नागझरी, तळोजे मजकूर, खिडूकपाडा, वळवली, आसूडगाव, धानसर, धरणागाव धरणा कॅम्प, पिसार्वे, तुर्भे, करवले व कोयनावेळे या महसुली गावांमध्ये गावठाण क्षेत्राची मोजणी करणे व नगर भूमापन क्रमांक देऊन भूखंडाचा नकाशा आणि मालकी हक्क दस्तावेज तयार करण्यास शासन मान्यता देण्यात आली. यामुळे या परिसरातील रहिवाशांना दिलासा व न्याय मिळवून देण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply