Breaking News

औद्योगिक सुरक्षा रामभरोसे

रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून उदयास येत आहे. या जिल्ह्यात यापूर्वीच मोठमोठाले औद्योगिक प्रकल्प आले. त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांचा बेकारीचा प्रश्न काही प्रमाणात सुटला. परंतु समस्यादेखील तितक्याच निर्माण झाल्या आहेत. प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्याचबरोबर औद्योगिक सुरक्षेचीदेखील समस्या आहे. मागील काही महिन्यांमध्ये औद्योगिक प्रकल्पांमध्ये झालेल्या अपघातांचा विचार केल्यास रायगड जिल्ह्यातील औद्योगिक सुरक्षा ही रामभरोसे आहे, असेच म्हणावे लागेल. सातत्याने होणार्‍या या घटना संभाव्य धोक्याची सूचना देत आहे. मात्र याकडे गांभीर्याने पहिले जात नाही.

रायगड जिल्ह्याला राज्याचा औद्योगिक जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे. भौगोलिक दृष्ट्या मुंबईशी जोडला असल्याने, गेल्या चार दशकात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले आहेत. यात रासायनिक कंपन्यांचे प्रमाण अधिक आहे. रासायनिक सांडपाण्याची विल्हेवाट लावणे सहज शक्य असल्याने रायगड जिल्ह्यात अनेक रासायनिक कंपन्यांनी आपले प्रकल्प सुरु केले आहेत. यात रसायनी येथील पातळगंगा इंडस्ट्रीअल इस्टेट, रोहा येथील धाटाव, पनवेलमधील तळोजा आणि महाड येथील औद्योगिक वसाहतींचा समवेश आहे.

रोहा औद्योगिक वसाहतीत एकूण 34 कंपन्या आहेत. यातील सध्या 28 कंपन्या सुरु आहेत आणि त्या रासायनिक आहेत. महाड औद्योगिक वसहातीत 70 कंपन्या आहेत यातील 30 कंपन्या या रासायनिक उत्पादने घेणार्‍या आहेत. नागोठणे, रसायनी आणि तळोजा येथेही रासायनिक कंपन्या मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. याशिवाय आरसीएफचा खत आणि लिक्वीड अमोनिया प्रकल्प, आरपीसिएलचे पेट्रोकेमिकचा पेट्रोकेमिकल प्रकल्प, ओएनजीसी, एचपीसील आणि गेलचे गॅस प्रकल्प जिल्ह्यात आहेत. त्यामुळे औद्योगिक सुरक्षेला गांभिर्याने घेणे गरजेच आहे. 

रायगड जिल्ह्यातील औद्योगीक क्षेत्रात गेल्या वर्षभरात 24औद्योगिक दुर्घटना घडल्या. यात 10 प्राणघातक अपघात, सात आग लागण्याच्या घटना, दोन आद्योगिक कंपन्यामधील स्फोट तर पाच वायू गळतीच्या घटनांचा सामावेश आहे. या दुर्घटनामध्ये 14कामगार व दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  अन्य सहाजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जिल्ह्यात यापुर्वी औद्योगिक अपघातांच्या अनेक घटना घडल्या आहेत. मागील तीन वर्षात जिल्ह्यात औद्योगिक कंपन्यामधील वायू गळतीच्या 10 दुर्घटना घडल्या होत्या. यात दोनजणांचा मृत्यू झाला.  16 जण जखमी झाले होते. माणसांप्रमाणेच प्राण्यांचेदेखील औद्योगिक दुर्घटनांनी बळी घेतले. 2019 मध्ये रसायनी येथील एचओसी कंपनीतून वायू गळती झाली होती. त्यात 31 माकडं आणि अनेक पक्षांचा हकनाक बळी गेला होता.

आपत्कालिन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ऑफ साईट इमरजन्सी गृप स्थापन करणे गरजेच असते. हा गृप औद्योगिक वसाहतींमधील विविध कंपन्या सामुहिकरित्या राबवत असतात. रासायनिक अपघात झाल्यास मदत, बचाव कार्य करणे आणि रासायनिक घटकांपासून उद्भवणारे धोके रोखण्यासाठी सामुहीक प्रयत्न करणे, कंपन्या परिचालन सुरळीत करणे यासारखी कामे हा गृप करत असतो. मात्र बहूतांश औद्योगिक वसाहतीमध्ये असे आपत्ती व्यवस्थापन करणारे गृप अस्तीत्वातच नाही. जिल्ह्यात एखादा प्रकल्प आणतांना त्यांची जनसुनावणी घेतली जाते. यावेळी संबधित कंपनी स्थानिकांना सुरक्षेची हमी देते. नंतर मात्र प्रकल्प कार्यान्वयीत झाल्यावर सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविले जातात.

सातत्याने होणार्‍या या घटना संभाव्य धोक्याची सूचना देत आहे. मात्र याकडे प्रशासकीय यंत्रणाचे दुर्लक्ष आहे. त्याबत शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधीदेखील काही बोलत नाहीत. अपघात झाल्यानंतर अपघात स्थळी भेट द्यायची, बैठका घ्यायच्या, कागदीघोडे नाचवायचे ही औपचारिकता केली जाते. त्यापलीकडे काही होत नाही. कुणावर कारवाई होत नाही. रासायनीक कंपन्यांची सुरक्षा तपासणी योग्य प्रकारे केली जात नाही. सुरक्षेची मानकेही पाळली जात नाही. अनेक रासायनिक कंपन्यांमध्ये पुर्ण वेळ कंपनी सुरक्षा अधिकारीची नेमणूक केली जात नाही. कंत्राटी पध्दतीने या अधिकार्‍यांची नेमणूक केली जाते.

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आपत्ती व्यवस्थापन कमिटी स्थापन केली जात असते. दर तीन महिन्यांनी ही कमिटी औद्योगिक वसाहतीमधील सुरक्षात्मक उपाययोजनांचा आढावा घेत असते. या बैठका नियमितपणे होत नाहीत.

मँगनॅटीक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत राज्यात दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. यात रायगडमधील जवळपास 21 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मुरुड, अलिबाग, रोहा तालुक्यात नव्याने औद्योगिक वसाहती उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांची संख्या आणखीन वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन औद्योगिक प्रकल्पांच्या सुरक्षितेतेकडे जास्त भर देणे गरजेचे आहे.

औद्योगिक कंपन्यामधील अपघातांना अनेक घटक कारणीभूत ठरतात. विशेषतः रासायनिक कंपन्यामध्ये काम करणारे कामगार हे अत्यंत कुशल असणे आवश्यक असते, त्यांना रासायनिक पदार्थ हाताळण्याचे ज्ञान असणेही आवश्यक असते. मात्र रसायने हाताळण्याचे अपुरे ज्ञान असलेले कामगार हे पदार्थ हाताळतात. काम करताना ते सुरक्षा नियमांचे पालन करत नाहीत. परिणामी दुर्घटना घडतात. त्यामुळे कुशल कामगारांची नेमणूक करणेही औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे, असे या क्षेत्रात काम करणार्‍या तज्ज्ञांचे मत आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

बरेचदा कंपन्याकडून देखभाल, दुरूस्तीची कामे केली जात नाहीत. त्याचबरोबर कामगार आणि कंपनी प्रशासन यांच्याकडून यंत्रे हाताळताना योग्य काळजी घेतली जात नाही. त्यामुळे अशा दुर्घटना घडतात. ही बाब लक्षात घेऊन सर्व कंपन्यांनी कामगार प्रशिक्षण आणि सुरक्षा विषयक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यायला हावी. उद्योग यायलाच हवेत. त्याचबरोबर सुरक्षादेखील महत्वाची आहे. त्यासाठी आवश्यकत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. औद्योगिक सुरक्षा  रामभरोसे ठेऊन चालणार नाही.

-प्रकाश सोनवडेकर

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply