पोलादपूर : प्रतिनिधी
येथील एसटी बस स्थानकामध्ये स्वच्छतागृह आणि गटारांचे दूर्गंधीयुक्त सांडपाणी मोठया प्रमाणात वाहू लागले आहे. त्या संदर्भात मनसेने सोमवारी (दि. 4) स्वाक्षरी आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रवासी आणि जनतेने पाठिंब्याची स्वाक्षरी केली. पोलादपूर एसटी बस स्थानकांतून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर येणार्या सांडपाण्याबाबत यापूर्वी मनसेने बॅनरबाजी करून आंदोलन केले होते. आता मनसेचे शहर अध्यक्ष दर्पण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारपासून स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मनसेचे योगेश सकपाळ, ओंकार मोहिरे, प्रवीण पांडे, सुमित जिमन, आदेश गायकवाड, वसीम धामणकर, निखिल वनारसे, सुरज जगताप, आदित्य गायकवाड, किरण जगताप, नवनाथ पवार यांनी पोलादपूर एसटी स्थानकांतील प्रवाशांना स्वाक्षरी मोहीमेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. या स्वाक्षरी मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाल्याने एसटी महामंडळाच्या महाड आगाराचे वाहतूक व्यवस्थापक शिवाजी जाधव यांनी पेण विभागीय नियंत्रकांसोबत मोबाईलद्वारे चर्चा करीत मनसे पदाधिकार्यांना स्वाक्षरी मोहीम थांबविण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत सोमवारी दुपारी हे आंदोलन मागे घेण्यात आले.