महानगरपालिकेचा वर्धापन दिन जल्लोषात साजरा
नवी मुंबई ः बातमीदार
नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सभागृहाची सदस्य म्हणून काम करताना तेव्हाच्या मोजक्या आर्थिक बजेटमध्ये नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा पुरविण्याचा वसा 31 वर्ष कायम राखत आज नवी मुंबईला देशातील अग्रमानांकित शहर म्हणून नावाजले जात आहे याचा आनंद व्यक्त करीत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईच्या प्रगतीत सर्व घटकांचे अनमोल योगदान असल्याचे मत व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 31व्या वर्धापन दिनानिमित्त विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित वर्धापनदिन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, सुजाता ढोले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, सोमनाथ पोटरे, मंगला माळवे, अनंत जाधव, सहा.संचालक नगररचना सोमनाथ केकाण, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, अजय संखे, मदन वाघचौडे, शुभांगी दोडे, सुनिल लाड, प्रविण गाडे, सहा.आयुक्त दत्तात्रय घनवट, चंद्रकांत तायडे, महेंद्र सप्रे, सुखदेव येडवे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी, मागील वर्षभरात नवी मुंबई महानगरपालिकेस मिळालेल्या राष्ट्रीय, राज्य स्तरावरील पुरस्कार, सन्मान यांचा विशेष उल्लेख केला. आज 31 वा वर्धापन दिन साजरा करीत असताना यापुढील काळात आपल्या शहराची मानांकने अधिक उंचावत राहण्याचा निर्धार त्यांनी अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने व्यक्त केला. कार्यक्रमात डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त झालेले वैद्यकीय अधिकारी डॉ.रावसाहेब पोटे व डॉ.हरविंदर सिंग, समाजसेवक प्रतिभा देहाडे, अधिक्षक देवेंद्र ब्राम्हणे, वरिष्ठ लिपिक राजू रोहनकर, आरोग्य सहाय्यक सविता म्हामुणकर, जोडारी भरत देशमुख तसेच मुख्याध्यापिका ज्योत्स्ना पाटील, प्राथमिक शिक्षिका संजीवनी गावंड यांचा सेवानिवृत्तीनिमित्त विशेष सन्मान करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण दिवसभर महानगरपालिका अधिकारी- कर्मचार्यांचे गीत, नृत्य, नाटय आदी कलागुणदर्शनपर कार्यक्रमही झाले.