सकाळी धुके, दुपारी ऊन, सायंकाळी पाऊस; दिवसभरात तीन ऋतूंचा अनुभव
माणगाव : प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षापासून निसर्गचक्र बदलले असून यंदा जानेवारी महिन्यात तर दिवसभरात हिवाळा, उन्हाळा व पावसाळा असे तीनही ऋतू अनुभवायला मिळत आहेत. या बदललेल्या निसर्गचक्रामध्ये शेतकरी राजाची मात्र परवड सुरु आहे.
आपल्याकडे सर्वसामान्यपणे जून ते ऑक्टोबर या महिन्यात पावसाळा असतो. गेल्या दोन वर्षात मात्र प्रत्येक महिन्यात पावसाने हजेरी लावली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर व या वर्षीतर जानेवारी महिन्यातही पाऊस पडत असल्याने बळीराजा हैराण झाला आहे.
निसर्गाचे चक्र कधी बदलत नाही, असे म्हणतात. मात्र त्याला 2019 व 20 आणि आता 21 हे वर्ष अपवाद ठरले आहे. साधारणपणे जून महिन्याच्या सुरुवातीला सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला थांबलेला असतो. त्यानंतर हिवाळ्याला सुरूवात होते. ऑक्टोबर महिन्यात उन्हाळा आणि सकाळ, संध्याकाळी थंडी असे गुलाबी वातावरण असते. या वर्षी मात्र जानेवारी महिना सुरू होऊन आठवडा उलटून गेला तरी परतीचा पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही.
चक्रीवादळ, कोरोना महामारी यामुळे अगोदरच कंबरडे मोडले असताना अवकाळी पावसाचा परतीचा प्रवास लांबत चालला आहे. संपूर्ण जिल्ह्यात सकाळ, दुपार व संध्याकाळी हिवाळा, उन्हाळा व पावसाळा या तीनही ऋतूंचा अनुभव येत आहे. सकाळी सर्वत्र दाट धुक्याची चादर असते, दुपारी कडक ऊन व संध्याकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडतो. यामुळे निसर्ग बदलला आहे की, काय असे बोलले जात आहे.
या अवकाळी पावसाचा विशेषत: शेती, वीटभट्टी व्यवसायिकांना मोठा फटका बसत आहे. भाजीपाला पीके झोपल्यामुळे रायगडातील शेतकरी हवालदिल आला आहे. तर या पावसाने वीटभट्टी व्यवसायिकांचे मोठे नुकसान होत आहे.
गेल्या तीन वर्षंपासून अवकाळी पाऊस शेतीचे नुकसान करीत आहे. या वर्षी तर शेतकरी निसर्ग वादळ, कोरोना महामारी व अवकाळी पाऊस अशा चक्रात अडकला आहे. दर महिन्यात पाऊस पडत असल्याने शेतीचे, भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान होत आहे.
-नामदेव पोटले, शेतकरी, माणगाव
अवकाळीने शेतीचे नुकसान होत आहे. वारंवार पडणारा पावसामुळे जमिनीचे ओल कायम आहे. ढगाळ हवामान, पावसामुळे किडींचा प्रादुर्भाव होत आहे. हातात आलेले पीक यामुळे नुकसानीत जाईल.
-संदीप खडतर, अध्यक्ष, आत्मा शेतकरी संघटना, माणगाव