Breaking News

मुंबईत विविध दुर्घटनांमध्ये 25 जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचून मुंबईची तुंबई झाली. चेंबूरमध्ये डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा बळी गेला आहे. याचबरोबर विक्रोळीत एक दुमजली इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय भांडूपमध्ये भिंत कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, रविवारी (दि. 18) सलग दुसर्‍या दिवशी पावसाचा जोर कायम होता.
मुंबईच्या चेंबूरमधील आरसीएफ परिसरातील भारत नगरमध्ये डोंगर पायथ्याशी बांधलेल्या भिंतीवर दरड कोसळली. त्यामुळे ही भिंत लागूनच असलेल्या घरांवर कोसळली आणि मोठी दुर्घटना झाली. या दुर्घटनेमध्ये 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी मध्यरात्री 12.30च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या वेळी स्थानिकांनी तातडीने वैयक्तिक पातळीवर बचावकार्य सुरू केले. त्याच वेळी बचाव यंत्रणेलादेखील माहिती देण्यात आली. त्यामुळे माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. या भागात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल झाला होता. त्यामुळे बचावकार्य करण्यात एनडीआरएफच्या जवानांनाही अडचणींचा सामना करावा लागला.
दुसरीकडे विक्रोळीच्या सूर्यनगर परिसरातील झोपडपट्टीमध्ये एक दुमजली इमारत पहाटे 3च्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. तेथेही मलबा हटवण्याचे काम सुरू होतेे.
चेंबूर आणि विक्रोळीप्रमाणेच भांडूपमध्येही अशाच प्रकारची एक दुर्घटना घडली आहे. भांडूपच्या अमरकोट भागात संरक्षक भिंत कोसळून 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. सोहम थोरात असे या तरुणाचे नाव असून, तो घरात आलेले पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी डोंगरावरचे दगड आणि माती खाली आली. स्थानिक रहिवाशांनी प्रयत्न करून त्याला बाहेर काढले, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे नंतर जाहीर करण्यात आले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पुन्हा हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या तुफान पावसामुळे अनेक परिसर जलमय झाले होते. त्याचा रेल्वे, रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.

मृतांच्या नातेवाइकांना मदत जाहीर
मुंबईत झालेल्या दुर्घटनांबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आदींनी दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनांमधील मृतांच्या नातेवाइकांना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून मृतांच्या नातेवाइकांना दोन लाख, तर जखमी झालेल्या व्यक्तींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली असून जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

या दुर्घटनेतील मृतांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना प्रकट करीत आहे. जखमी झालेल्या व्यक्तिंच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधार व्हावा ही प्रार्थना करतो.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Check Also

गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Leave a Reply