दोन लाख 61 हजारांत विक्री
अलिबाग ः प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर येथे मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात 22 किलो वजनाचा घोळ मासा सापडला. या माश्याची लिलावात तब्बल दोन लाख 61 हजार रुपयांना विक्री करण्यात आली. त्यामुळे हा मासा पकडणारे मच्छीमार चांगलेच मालामाल झाले आहेत.
जीवना बंदरावरील मच्छीमार जयेंद्र पाटील, उद्देश पावशे, हेमंत चुनेकर व नितीन पाटील हे समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. जाळी लावून बसले असताना जाळ्यात मोठा मासा अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा मासा सुटण्यासाठी धडपड होता. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी तातडीने जाळी वर ओढली आणि जाळीसकट माश्याला किनार्यावर घेऊन आले.
जाळीत भला मोठा घोळ मासा अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. किनार्यावर झालेल्या लिलावात स्थानिक व्यापार्यांनी माशाला दोन लाख 61 हजारांची बोली लावून हा मासा खरेदी केला. त्यामुळे चारही मच्छीमार मालामाल झाले आहेत.
घोळ हा मासा कोकण किनारपट्टीवर क्वचितच सापडतो. चविष्ट आणि गुणकारी असल्याने त्याला मोठी मागणी असते. त्याचबरोबर माश्याचे जठर आणि फुफ्फुस आदी अवयवांचा वापर शल्यचिकित्सेसाठी लागणारे धागे बनविण्यासाठी केला
जात असल्याचे स्थानिक मच्छीमार सांगतात. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत हा मासा किनार्यालगतच्या परीसरात आढळून येतो. या माश्याला मोठी मागणी असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.