Breaking News

शेअर बाजारातील फसवणुकीतून कसे वाचाल?

टिप आधारित कंपन्यांचे शेअर्स क्वचितच संपत्ती निर्माते ठरू शकतात.  त्यामुळे आपण न्यूज चॅनेल पाहत असाल आणि त्यानुसार बाजारात तुम्ही निर्णय घेतले असल्यास तो तुमच्यासाठी एक पाश असू शकतो आणि त्यात अडकल्यास नुकसान होण्याच्या शक्यताच वाढतात. मागील आठवडाभर शेअर बाजारात तेजीचा कहर होता. विस्तारित आधार असलेल्या निफ्टी 50 निर्देशांकामधून अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स, बजाज-ऑटो, सिप्ला, आयशर मोटर्स, ग्रासिम, एचसीएल टेक, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, श्री सिमेंट, सनफार्मा, टीसीएस, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट आणि विप्रो अशा 50 पैकी तब्बल 16 कंपन्यांनी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी नवीन 52 आठवडी उच्चांक नोंदवले. सप्टेंबर अखेरीपासून बाजारानं पकडलेली उर्ध्व दिशेची लय अजून काही सोडलेली आढळत नाही. या तेजीमध्ये काहीजण आश्चर्य करीत आहेत तर काहींचा अपेक्षाभंग झालेला दिसत आहे. काही बुचकळ्यात आहेत, तर काही तेजीच्या लाटेवर स्वार आहेत. हीच वेळ आहे सर्वार्थानं सावध असायची आणि आपली विवेकबुद्धी वापरायची. गेले काही महिने अनेक तथाकथित तज्ज्ञमंडळी बाजारात मोठ्या पडझडीची शक्यता उघड बोलून दाखवत होते, परंतु याउलट सप्टेंबर ते आतापर्यंत केवळ निफ्टी निर्देशांकानं जवळपास 33 टक्के वाढ नोंदवलीय. म्हणजेच याचा स्पष्ट अर्थ असा होतो की बाजारात (अति) शहाणं कोणीच नाही. पडत्या बाजारात भल्या भल्या बिग बुल्सनीसुद्धा माती खाल्लेली आपण वाचत आलोच होतो. त्यामुळे बाजाराचा तळ व शिखर यांचा अंदाज लावणं अशक्य आहे आणि म्हणूनच अनेक लोक बाजारातील अनेक भूलथापांना बळी पडतात. गेल्या आठवड्यातच एका टीव्ही अँकरच्या मुलाखतीत ती व्यक्ती धातू कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात विक्रीचा अंदाज वर्तवत होती आणि आता यानंतर अशा कंपन्यांमधील गुंतवणुकीमधून परतावा मिळण्याची अपेक्षा ठेवताना दिसत नव्हता आणि पुढील दोन दिवस धातू कंपन्यांच्या शेअर्सनीच जोरदार तेजी नोंदवली. जिंदाल स्टील, टाटा स्टील, हिंडाल्को, हिंदुस्थान झिंक, हिंदुस्थान कॉपर हे त्यापैकीच काही. अनेक वेळा आपण न्यूज चॅनलवर एखाद्या कंपनीबद्दल एखादी चांगली बातमी पाहतो, मात्र शेअरचा भाव तातडीनं खाली येऊ लागतो. याउलट एखाद्या कंपनीबद्दल वाईट बातमी आल्यास त्या कंपनीच्या शेअरचा भाव प्रचंड वाढतो. त्याचप्रमाणे बरेच ऑपरेटर काही विशिष्ट कंपन्यांची शिफारस करतात, ज्या कंपन्यांच्या व्यवसायाचा आगापीछा नसतो. मग सुरुवातीच्या काळात अशा शेअरचे भाव वाढतात. आपण मोहात पडतो आणि वरच्या भावात गुंतवणूक करून बसतो. त्यानंतर तथाकथित ऑपरेटर वरच्या स्तरावर त्याच्याजवळील बहुतेक सर्व शेअर्स विकून टाकतो आणि त्या कंपनीच्या शेअर भावात मोठ्या प्रमाणात घट होते आणि नंतर दरीकडे जाणार्‍या एखाद्या ड्रायव्हर नसलेल्या बससारखी त्या शेअरची परिस्थिती होते. आपण आपली संपूर्ण गुंतवणूक अडकवून ठेवलेली असते. मग संपूर्ण आयुष्यात ना आपला खरेदी-भाव येतो, ना आपलं भांडवल परत मिळतं. म्हणून सावध राहा आणि अडकून राहू नका.

टिप आधारित कंपन्यांचे शेअर्स क्वचितच संपत्ती निर्माते ठरू शकतात.  त्यामुळे आपण न्यूज चॅनेल पाहत असाल आणि त्यानुसार बाजारात तुम्ही निर्णय घेतले असल्यास तो तुमच्यासाठी एक पाश असू शकतो आणि त्यात अडकल्यास नुकसान होण्याच्या शक्यताच वाढतात. हे झालं नुकतंच घडलेलं एक उदाहरण, परंतु अशा कोणत्याही प्रकारे न फसण्यासाठी आपणच खबरदारीचे उपाय करू शकतो. आज आपण अशा सामान्य/सर्वसाधारण टाळता येण्यासारख्या चुका पाहूयात.

1. सर्वप्रथम आपली मानसिकता बदला – जर तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंगच्या उद्देशाने आला असाल तर आपल्या लावलेल्या भांडवलावर समाधानकारक नफा मिळत असल्यास तो आधी काढून घ्या. कोणत्याही उत्तम व्यापार्‍यास गोष्टी सांगावयाची गरज पडत नाही. जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर उत्तम कंपन्या निवडून निर्धास्त राहा, मात्र आपल्या गुंतवणुकीबद्दल जागरूकता बाळगा.

2. गुंतवणुकीवर प्रेम करा, कंपन्यांवर नाही – अनेक वेळा आपण एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यामुळे त्या कंपनीबद्दल आपणास आपुलकी वाटू लागते आणि आपण कंपनीबद्दल जरा जास्तच भावनिक होऊन जातो आणि कंपनीवर प्रेम करू लागतो, परंतु इथं आपण आपल्या भावनांना आपल्या ताब्यात ठेवणं गरजेचं ठरतं. कारण जर कंपनी नुकसानीत जात असेल तर काळाची पावले ओळखून आपली गुंतवणूक त्यातून बाहेर काढलेले हिताचे ठरू शकते.

3. झुंड प्रवृत्ती – अनेक वेळा आपण पाहतो की शेअर बाजारातील खरेदीबाबत सामान्यत: ओळखीच्या, शेजारी, सहकारी किंवा नातेवाइकांच्या निर्णयाचा जास्त प्रभाव असतो. अशा प्रकारे जर आजूबाजूचा प्रत्येक जण एखाद्या विशिष्ट कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करत असेल, तर संभाव्य गुंतवणूकदारांची प्रवृत्तीदेखील तशीच होऊ शकते, यालाच झुंड प्रवृत्ती म्हणता येईल. ज्याप्रमाणं प्रत्येकाचं उत्पन्न, गरजा व भविष्यासाठीची रणनीती ही वेगवेगळी असू शकते, त्याचप्रमाणं प्रत्येकाचं गुंतवणुकीबद्दलचं मत वेगवेगळं असावं. कारण जे इतरांना साजेसं असतं ते आपल्याला सोयीचं आहे का हे तपासावं. गुंतवणूक गुरू वॉरेन बफेट म्हणतातच, जेव्हा बाजारात प्रत्येक जण लोभी होऊ लागतो तेव्हा बाजारापासून दूर व्हा आणि जेव्हा पडत्या बाजारात प्रत्येक जण धास्तावलेला असतो तेव्हा बाजारातील गुंतवणुकीबाबत लोभी व्हा. आपल्याकडं म्हटलेलंच आहे की ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं.

4. योग्य मार्गदर्शन – आपल्या कुवतीप्रमाणं कोणत्या प्रकारची गुंतवणूक आपली दीर्घकालीन उद्दिष्ट पार पाडण्यासाठी योग्य ठरू शकते याचा अभ्यास व प्रशिक्षण व्यावसायिक गुंतवणूक सल्लागारांना असतं. गरज आहे ती अशा व्यावसायिक मार्गदर्शनाची. ज्याप्रमाणं आपण एखाद्या डॉक्टर अथवा वकिलाकडं गेल्यावर त्यांना आपल्या प्रकृतीबद्दल/प्रकरणाबद्दल संपूर्ण तपशीलवार माहिती देतो, अगदी त्याचप्रमाणं आपल्या भविष्यातील आर्थिक गरजा व उद्दिष्टांकरिता योग्य मार्गदर्शनासाठी एका आर्थिक सल्लागाराशी चर्चा करणं आणि सामोपचारानं अशा गुंतवणूक सल्लागाराचं मार्गदर्शन मोलाचं ठरू शकतं.

5. भावामध्ये नव्हे, तर कंपनीच्या व्यवसायात गुंतवणूक करा – अनेक वेळा शेअरच्या भावाकडं पाहून त्यात उडी घेणार्‍यांची संख्या जास्त आढळते. त्याऐवजी कंपनीचा व्यवसाय, त्यातील बारकावे जाणून मगच अशा कंपन्यांच्या शेअर्सद्वारे योग्य भावात गुंतवणूक करा.

सुपर शेअर : एलआयसी हौसिंग फायनान्स – आगामी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधा क्षेत्रास प्राधान्य मिळेल या अपेक्षेनं व पारेख कमिटीच्या अहवालानुसार नवीन बांधकामांच्या कन्स्ट्रक्शन प्रीमियममध्ये 50 टक्के कपात केल्यानं इन्फ्रा व रिअल्टी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. ज्या बांधकाम कंपन्या कन्स्ट्रक्शन प्रीमियममधील 50 टक्के सवलतीचा फायदा घेतील त्यांना ग्राहकांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल व ज्या कंपन्यांचा प्रमुख व्यवसाय निराळा असून अशा कंपन्यांकडे स्वतःची बांधकामपयोगी अशी प्रचंड जागा (लँडबँक) आहे अशा कंपन्यांना फायदा होऊ शकतो. (उदा. गोदरेज प्रॉपर्टीज, ओबेराय रिअल्टी, पुर्वांकर, शोभा डेव्हलपर्स, कोलते-पाटील, इ.) स्टॅम्प ड्युटी कपात, कमी घरकर्जाचा व्याजदर आणि आता कन्स्ट्रक्शन प्रीमियममध्ये मिळालेली सवलत याचा एकत्रित परिणाम घर खरेदीदारांसाठी फायद्याचा ठरू शकत असल्यानं पर्यायानं हौसिंग फायनान्स कंपन्यांचे शेअर्स तेजीत निघाले. एचडीएफसी, एलआयसी हौसिंग फायनान्स, इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स इ. त्यामधून एलआयसी हौसिंग फायनान्सचा शेअर 18.5 टक्के वाढ नोंदवून गेल्या आठवड्याचा सुपर शेअर ठरला. दैनिक तक्त्यावर पुढील उद्दिष्ट 480 रुपयांचं असून पडझडीत पुनर्खरेदीसाठी संधी आहे.

-प्रसाद ल. भावे

Check Also

आमदार महेश बालदी 29 ऑक्टोबर रोजी दाखल करणार अर्ज

उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे …

Leave a Reply