Breaking News

पनवेल एसटी आगाराच्या कामाला मुहूर्त कधी?

गुजरात परिवहन महामंडळाच्या सुरत येथील आगाराप्रमाणे पनवेलचे एसटी आगार बांधणार, असे सेनेचे नेते तत्कालीन परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले होते. या बस पोर्टमध्ये तळमजल्यावर बस थांबा, प्रवासी विश्राम कक्ष, दुसर्‍या मजल्यावर बस डेपो व महामंडळाचे कार्यालय, तर तिसरा आणि चौथा मजला व्यावसायिकांसाठी असे नियोजन केल्याचे सांगून या कामाची सुरुवात 2019च्या गणपतीनंतर  होईल, असे सांगितले होते, मात्र या आगाराच्या कामाची सुरुवात 2020 संपले तरी न झाल्याने आगाराच्या नूतनीकरणाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे केली असून, काम सुरू न केल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या पनवेलमधून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथून येणार्‍या-जाणार्‍या एसटी गाड्या पनवेल स्थानकावर येत असतात. त्यातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. याशिवाय नोकरी-धंद्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून हजारो नागरिक या स्थानकातून प्रवास करतात. त्यासाठी पनवेल आगारातून रोज 72 नियते चालवली जातात. त्यापैकीअहमदनगर व शिर्डी ही फक्त दोन लांब पल्ल्याची व 70 गाव खात्यातील आहेत. त्यासाठी 165 चालक व 159 वाहकांची नेमणूक करण्यात आली आहे. रोज 5000पेक्षा जास्त गाड्या या स्थानकात येत असताना महामंडळाने मात्र पनवेल आगाराकडे दुर्लक्षच केले आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद पनवेलकर प्रवाशांच्या बाबतीत एसटीने अद्याप पाळलेले दिसत नाही. नैना प्रोजेक्टमुळे पनवेलचे महत्त्व वाढले आहे. रेल्वेचे टर्मिनसही पनवेल येथे होणार आहे. त्यामुळे पनवेलचे महत्त्व वाढत आहे. येथील नागरीकरणाच्या  वाढण्याचा वेग पाहून येथील एसटी आगाराचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव काँग्रेस राजवटीत करण्यात आला. त्या वेळी 80 कोटींच्या कामाला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजुरी दिली नाही. भाजप-सेना युतीचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गुजरात परिवहन मंडळाच्या सुरत येथील आगाराप्रमाणे पनवेलचे एसटी आगार बीओटी तत्त्वावर बांधण्याचा निर्णय घेऊन नवीन 280 कोटींचा प्रस्ताव तयार केला. एसटी महामंडळाने पनवेल आगार आधुनिक पोर्ट बनवण्याचा निर्णय घेतला. बीओटी तत्त्वावर बांधण्यासाठी एजन्सी नेमण्यात आली आहे. यासाठी 230 कोटी रुपये खर्च येणार आहे. या एजन्सीचे वास्तुरचनाकार, इंजिनियर आणि एसटीचे कार्यकारी अभियंता विनीत कुळकर्णी, विभाग नियंत्रक सुपेकर व इतर अधिकार्‍यांनी 17 मे 2018 रोजी पनवेल स्थानकाला भेट देऊन सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि प्रवासी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना बस स्थानकाचा आराखडा कसा असेल याची माहिती देण्यात आली. 17,500 स्क्वे. फुटाचे बस पोर्ट असेल. यामध्ये तळमजल्यावर वाहतूक नियंत्रक कक्ष, प्रवासी विश्राम कक्ष आणि  बस थांबा, त्यामध्ये 30 फलाटांची रचना केलेली आहे. प्रवासी फलाटावरून  गाडीच्या दरवाजात विमानाप्रमाणे जातील. प्रवासी आजूबाजूच्या मोकळ्या जागेत जाऊ शकणार नाहीत. दुसर्‍या मजल्यावर महामंडळाचे कार्यालय, तर बेसमेंटला पार्किंग व दुरुस्ती विभाग असेल. बाजूला अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी निवासस्थाने असे नियोजन करण्यात आले आहे. बसस्थानकातून रेल्वेस्थानकापर्यंत एव्हीलेटर बांधण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दोन्हीकडे जाणे-येणे सोपे होणार आहे. या कामाला सुरुवात झाल्यापासून 24 महिन्यांत काम पूर्ण करायचे आहे. काम वेळेत पूर्ण न झाल्यास एजन्सीला मोठा दंड आकारण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. सध्या ज्या जागेत डेपो आहे त्या ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. यामध्ये मॉल, पी. व्ही. आर. आणि इतर व्यावसायिक असतील. आगार बांधण्याचे 30 महिन्यांचे शेड्यूल कसे असेल, त्या काळात गाड्या कोठून सोडल्या जातील, कोणत्या अडचणी येतील यावर चर्चा करण्यात आली होती. महापालिकेकडून यासाठी लागणारी मदत आणि आवश्यक ना हरकत दाखले देण्याचे आदेश आमदारांनी संबंधितांना दिले होते, पण ऑक्टोबर 2020 आले तरी ठेकेदाराने फक्त महामार्गाच्या बाजूला काही भागात पत्रे लावून महामार्गावर प्रवाशांना बसण्यासाठी पत्र्याची शेड बांधून ठेवली आहे. प्रत्यक्ष आगाराच्या कामाला सुरुवात न झाल्याने आता पनवेल आगाराचे काम सुरू होईल की नाही, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. 

राज्य परिवहन महामंडळाच्या अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या पनवेल येथील बस आगाराच्या नूतनीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून बराच कालावधी होऊनही अद्याप कामाला सुरुवात झाली नाही. अतिशय दयनीय अवस्थेत असलेले पनवेल बस आगार अनेक पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. परिणामी प्रवासी व नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. कोविडपूर्वी तसेच कोविड काळात जवळपास दोन वर्षे बस आगाराच्या नूतनीकरणाचे काम सुरू होऊ शकले नाही ही वस्तुस्थिती आहे, परंतु सद्यस्थितीत सर्वच व्यवहार व विकासकामे सुरू असून, पनवेल बस आगाराच्या नूतनीकरणाचे काम सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. 

-प्रशांत ठाकूर, आमदार

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply