मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. दरम्यान, आता सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती लपवली असल्याचा आरोप करत त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. सोमय्या यांनी स्वत: यासंदर्भात माहिती दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्नीच्या नावे अलिबागमध्ये असलेली पाच कोटी रुपयांची संपत्ती माहीत असूनही ती निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दाखवली नाही. मी स्वत: या प्रकरणाचा जाऊन तपास केला. महाराष्ट्रातील भारत निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी बलदेवसिंग यांच्याकडे भाजपाने तक्रार दाखल केली आहे. उद्धव ठाकरे यांनी जाणूनबुजून आपली ही संपत्ती लपवली आहे आणि त्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही केली आहे, असे सोमय्या म्हणाले. तसेच बलदेवसिंग यांनी आम्हाला आमची तक्रार दिल्लीत निवडणूक आयोगाला पाठवणार असल्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी नमूद केले. अलिबाग येथील कोर्लई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी त्यांनी ठाकरे कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. अर्णव गोस्वामी अटक प्रकरणात किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि वास्तू सजावटकार अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याचबरोबर ठाकरे आणि नाईक कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली होती.