भाजप सांस्कृतिक सेलचे निवेदन
पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनामुळे पनवेल महापालिका क्षेत्रासह संपूर्ण राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून नाट्यगृह संपूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते, परंतु नुकतेच शासनाने काढलेल्या परिपत्रकामध्ये 22 ऑक्टोबरपासून नाट्यगृह सुरू करण्यात यावे, असे जाहीर केले आहे. त्याअनुषंगाने पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या भाड्यात 75 टक्के सुट जाहीर करावी, अशी मागणी भाजप सांस्कृतिक सेलच्या वतीने सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या कडे निवेदन देऊन करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत महापौर डॉ. कविता चौतमोल व आमदार प्रशांत ठाकूर यांना सादर केली आहे.
कोविड संदर्भातील इतर नियमावली, एसओपी दिलेली आहेत व सोबतच आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरू राहतील असे नमूद केले आहे. मागील वर्षी पहिल्या लॉकडाऊननंतर जेव्हा नाट्यगृह पुन्हा उघडण्यात आली होती तेव्हा भाजपच्या पत्राची दखल घेत महापालिकेने नाट्यगृहाच्या भाड्यामध्ये 50 टक्के सवलत जाहीर केली होती, परंतु याचदरम्यान ठाणे – नवी मुंबई, कल्याण डोंबिवली व इतर काही महापालिकांनी 75 टक्के सुट जाहीर केली होती. त्याचा परिणाम असा झाला कि त्या त्या शहरांमध्ये उत्तमोत्तम निर्माते आपले नाटक व कार्यक्रम प्रयोग करू लागले. ह्यातच मागील लॉकडाऊननंतर फडके नाट्यगृहामध्ये काही मोजकेच प्रयोग रंगले आणि त्याला कारण होते भाड्यामधली सूट. त्यामुळे पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या भाड्यातदेखील 75 टक्के सुट जाहीर केल्यास पनवेलच्या रसिक प्रेक्षकांना चांगली चांगली नाटके, प्रयोग, कार्यक्रमांचा आस्वाद घेता येईल व पनवेलची नाट्य व सांस्कृतिक चळवळ अधिक गतीने होण्यास मदत होईल.
नाट्यगृहाच्या भाड्यात सूट देण्यासंदर्भात निवेदन देताना भाजप सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सेलचे सदस्य अमोल खेर, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, उपाध्यक्ष चिन्मय समेळ उपस्थित होते.