Breaking News

हा तर ट्रेलर, लढा अजून बाकी आहे!; ‘रिलायन्स’विरोधातील प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन 47व्या दिवशीही सुरूच

नागोठणे : प्रतिनिधी

आम्ही रिलायन्स किंवा अंबानींच्या नाही, तर व्यवस्थेच्या विरोधात लढत आहोत. संविधानाचे कलम 19प्रमाणेच नागोठण्यातील प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू  आहे. त्यात यश आता जवळ येत चालले आहे. हा ट्रेलर असून लढा अजून चालू झालेलाच नाही, अशी स्पष्टोक्ती माजी न्या. बी. जी. कोळसे-पाटील यांनी येथे सभेत केली. नागोठणे येथील रिलायन्स कंपनीविरोधात 27 नोव्हेंबरपासून प्रकल्पग्रस्तांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाच्या 46व्या दिवशी सोमवारी (दि. 11) सायंकाळी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी न्या. बी. जी. कोळसे-पाटील यांनी सहाव्यांदा भेट दिली. त्या वेळी ते आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. टप्प्याटप्प्याने मागण्या मान्य करण्याचे कंपनीने मान्य केले असले तरी पूर्ण न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. लोकशासनने दोन वर्षांपूर्वी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न हातात घेतल्यानंतर या आंदोलनाला खर्‍या अर्थाने मूर्त स्वरूप आले आहे. कंपनी आता आपल्याला काहीतरी द्यायला निघाली असून तुम्ही एकजूट करून येथे बसल्यामुळेच हे शक्य झाले आहे. नीती आणि सत्य कोणाला हरवू शकत नाही हे यानिमित्ताने अधोरेखित झाले असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. संघटनेचे सरचिटणीस गंगाराम मिणमिणे, जिल्हाध्यक्ष शशांक हिरे, राष्ट्रीय संघटक राजेंद्र गायकवाड, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. संतोष म्हस्के यांचीही या सभेत मार्गदर्शनपर भाषणे झाली. या वेळी संघटनेचे स्थानिक अध्यक्ष चेतन जाधव, मोहन पाटील, प्रबोधिनी कुथे, जगदिश वाघमारे, अनंत फसाळे, नारायण म्हात्रे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात 220 प्रकल्पग्रस्तांचे नोकरीचे अर्ज रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांची छाननी करून रिलायन्स कंपनीत गेल्यावर पुढील अधिकृत प्रक्रिया पार पडल्यानंतरच आंदोलनाला स्थगिती देण्यात येईल.

-राजेंद्र गायकवाड, राष्ट्रीय संघटक, लोकशासन आंदोलन संघर्ष समिती

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply