पनवेल : वार्ताहर
जेएनपीटी महामार्गावरील दुभाजकावर लावण्यात आलेले वृक्ष कायमस्वरूपी हिरवेगार ठेवता यावेत या करिता राष्ट्रीय रस्ते प्राधिकरनाकडून ठिबक सिंचन पद्धतीचा (ड्रीप इरिगेशन सिस्टीम)वापर करण्यात येत आहे. कमी पाण्याचा वापर करून जास्तीत जास्त वृक्षांना पाणी देण्यासाठी या सिस्टीमचा वापर करण्यात येत असल्याची माहिती प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी दिली आहे.
राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाच्या वतीने 2016 सालापासून सुरु असलेल्या पळस्पे ते जेएनपीटी, कळंबोली ते डी पॉईंट तसेच पाम बीच ते जेएनपीटी महामार्गाचे काम सुरू आहे. या प्रवासाच्या दृष्टीने महामार्ग अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या हेतूने एनएचआईकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सुरक्षिततेसोबतच महामार्गावरील प्रवास आल्हादायक व्हावा या हेतूने महामार्गावर तयार करण्यात आलेल्या दुभाजकांमध्ये विविध प्रकारची शोभेची व फुलांची झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. ही झाडे कायमस्वरूपी हिरवेगार व टवटवीत ठेवण्यासाठी पाणी पुरवठा करताना कमीत कमी पाण्याचा वापर करून शेती करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या ड्रीप इरिगेशन सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे. तसेच दुभाजकावर ही सिस्टीम कार्यन्वित करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
ड्रीप इरिगेशन सिस्टीमद्वारे वृक्षांना पाणी देण्यासाठी महामार्गाच्या काही किलोमीटर अंतरावर दुभाजकामध्ये पाण्याच्या हजारो लिटर क्षमतेच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. या टाक्यांमध्ये टँकरच्या सहाय्याने साठवलेले पाणी ठिबक सिंचन यंत्राने वृक्षाच्या मुळापर्यंत पोहचवण्याचे काम केले जाणार आहे.
पाणी बचतीसह अपघाताला आळा
महामार्गाच्या दुभाजकावर लावण्यात येणार्या वृक्षांना पाणी देण्यासाठी टँकरचा वापर केला जातो. त्यामुळेे अनेकदा पाण्याचा अपव्यय होत असून अतिरिक्त पाणी रस्त्यावर येत असल्याने रस्त्यावर येणार्या पाण्यामुळे अथवा मार्गाच्या मधोमध चालणार्या टँकरमुळे अपघात होण्याची शक्यता असते. ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले गेल्यास रस्त्यावर पाणी येणे बंद होणार असून जास्तीत जास्त वृक्षांना हे पाणी पुरणार आहे.