Breaking News

ब्रिस्बेन कसोटीत पावसाची खेळी; दुसर्‍या दिवसाखेर भारत दोन बाद 62

ब्रिस्बेन : वृत्तसंस्था

ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवसाच्या अखेरच्या सत्रात पावसाने हजेरी लावली. सतत कोसळणार्‍या पावसामुळे पंच आणि सामनाधिकार्‍यांनी खेळ थांबवला. दुसर्‍या दिवसाखेर भारतीय संघाने दोन गड्यांच्या मोबदल्यात 62 धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप 307 धावांनी पिछाडीवर आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या जोडीने मैदानावर तग धरला आहे. पुजारा 8, तर रहाणे 2 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाला 369 धावांवर रोखल्यानंतर भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. युवा शुबमन गिलला कमिन्सने सुरेख चेंडूवर माघारी पाठवले. दुसरीकडे रोहित शर्माने नॅथन लायनच्या गोलंदाजीवर खराब फटका मारून आपली विकेट फेकली. रोहितने सहा चौकारांच्या मदतीन 44 धावांची खेळी केली. रोहित आणि शुबमन बाद झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी फलंदाजी करीत भारतीय संघाचा डाव सावरला. तत्पूर्वी भारतीय संघाच्या युवा गोलंदाजांनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 369 धावांवर रोखले. ऑस्ट्रेलियाकडून लाबुशेन याने 108, तर कर्णधार टिम पेन याने 50 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. भारतीय संघाकडून नटराजन, सुंदर आणि शार्दुल यांनी प्रत्येकी तीन बळी टिपले, तर मोहम्मद सिराजने एक गडी बाद केला.

गोलंदाजीत 71 वर्षांनी योगायोग

भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण करणार्‍या दोन गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. टी. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी प्रत्येकी तीन बळी टिपले. शार्दूल ठाकूरनेदेखील तीन गडी बाद केले, तर मोहम्मद सिराजला एक गडी बाद करता आला. भारतीय संघातून पदार्पणाच्या कसोटीत दोन गोलंदाजांनी एकाच डावात प्रत्येकी बळी घेण्याची ही दुसरीच वेळ ठरली. याआधी 1948-49च्या हंगामात वेस्ट इंडिजविरूद्ध भारतीय संघाने ही किमया साधली होती.

‘त्या’ फटक्यानंतर रोहित शर्मा ट्रोल

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावा केल्यानंतर भारतीय संघाच्या पहिल्या डावाची सुरुवात अडखळती झाली. सलामीवीर शुबमन गिल अवघ्या 7 धावांवर झेलबाद झाला. अनुभवी रोहित शर्मा मोठी खेळी करणार अशी चाहत्यांना आशा होती, पण 44 धावांवर असताना बेजबाबदार फटका खेळत तो बाद झाला. संयमी खेळी करण्याची गरज असताना रोहित शर्मा क्रीजमधून पुढे आला आणि त्याने हवाई फटका खेळला. लायनने सीमारेषेवर लावलेल्या फिल्डरने रोहितचा सहज झेल पकडत त्याला तंबूत धाडले. रोहितने तो फटका खेळल्यानंतर सारेच चाहते नाराज झाले. एक चांगली सुरुवात मिळाल्यानंतर रोहितला अर्धशतकही पूर्ण करता आले नाही. बेजबाबदार फटका खेळल्याने त्याच्यावर चाहत्यांनी टीकेचा भडीमार केला. तिसर्‍या कसोटीतदेखील रोहित अर्धशतक पूर्ण करताच बेजबाबदार फटका खेळला होता. 52 धावांवर असताना त्याने उसळता चेंडू हवेत टोलवला होता आणि मिचेल स्टार्कने त्याचा झेल घेतला होता.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply