पनवेल ः प्रतिनिधी
वयोवृद्धांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. पनवेल परिसरात असे अनेक वयस्कर रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, रोग झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊ नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर खांदा वसाहतीतील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांनी याकामी पुढाकार घेतला आहे.
पनवेल परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. खांदा वसाहतीतसुद्धा काही रुग्ण सापडलेत, तर एकाचा या महामारीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या त्याचबरोबर इतर आजार असल्याने कोरोनाचा संसर्ग लवकर होत आहे. आयुष मंत्रालयाच्या शिफारशीनुसार आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचा डोस रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्यानुसार खांदा कॉलनीमध्ये स्थानिक नगरसेवक संजय भोपी यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना या गोळ्या देण्यात येत आहेत, जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल आणि कोरोना विषाणूंचे संक्रमण होणार नाही. यासाठी आपण पनवेल महानगरपालिकेकडे अर्ज केल्याचेही भोपी यांनी सांगितले.
खांदेश्वर पोलिसांसाठी औषधी गोळ्याखांदेश्वर पोलीस स्टेशनसाठी डॉ. संतोष आगलावे यांनी उपलब्ध करून दिलेल्या गोळ्यांचे पॅकेट्स वरिष्ठ निरीक्षक श्याम शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या वेळी प्रभाग समिती अध्यक्ष संजय भोपीही उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper