Breaking News

आवक घटल्याने मासळी कडाडली

मुरूड ः प्रतिनिधी 

मुरूड तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात मासळीचे दर गगनाला भिडले असून, सामान्य व मध्यमवर्गीय लोकांना मासळी खरेदी करणे कठीण जात आहे. मटणासाठी सध्या 700 रुपये किलोचा दर असून तोच दर आता एक सुरमईच्या नगासाठी ग्राहकाला द्यावा लागत आहे. मटण व मासळीचा दर सध्या समान गतीने असल्याने लोकांना मासळी खरेदी करणे कठीण होऊन बसले आहे.

खोल समुद्रात जाणार्‍या होड्यांना मोठ्या प्रमाणात मासळी मिळत नसल्याने मुख्य बाजारातील मासळीची आवक घटली. परिणामी मासळी मार्केटमधील दर गगनाला भिडल्याचे निदर्शनास येत आहे. अचानक मासळीची आवक घटल्याने स्थानिकांबरोबरच पर्यटकांनासुद्धा जादा पैसे मोजून हॉटेलमधून मासळी घ्यावी लागत आहे. सध्या मासळी मार्केटमध्ये सुरमई, हलवा, पापलेट व कोळंबी हीच मासळी नजरेस पडते, परंतु या मासळीची आवक कमी झाल्याने जास्त दराने ग्राहकांना मासळी खरेदी करावी लागत आहे. मासळीचे भाव वाढल्याने सामान्य ग्राहक कोळंबी अथवा निवड घेण्याला प्राधान्य देत आहेत. मासळीची आवक कमी झाल्यामुळे प्रत्यक्ष लिलाव होताना विक्रेत्यांना चढ्या भावाने मासळी विकत घ्यावी लागते. त्यामुळे मासळीचे दर वाढले आहेत.

अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मासेमारी करणे कठीण झाले होते. त्यातच 2020पासून मच्छीमारांवर अनेक संकटे कोसळली. आता वातावरण चांगले असतानाही मोठ्या प्रमाणात मासळी मिळत नसल्याने मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत.

सध्या मासळीचे दर वाढले आहेत हे सत्य आहे. याचे कारण म्हणजे समुद्राचे पाणी स्वच्छ झाले आहे. त्यामुळे माश्यांना समुद्रात टाकलेले जाळे दिसते. त्यामुळे जाळ्यात मासे फसत नाहीत. एक महिना अशीच परिस्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर परिस्थिती निवळेल व पूर्वीप्रमाणेच मासे मिळतील.

-मनोहर बैले, उपाध्यक्ष, रायगड जिल्हा मच्छीमार संघ

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply