Breaking News

उपेक्षित कुलाबा किल्ला

सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या मराठा आरमाराचे मुख्यालय असणारा ऐतिहासिक कुलाबा किल्ला 300 वर्ष समुद्राच्या लाटांचा मारा झेलत उभा आहे. महाराष्ट्राचे वैभव असेलेल्या या किल्ल्याची तटबंदी आता ढासळत आहे. किल्ल्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. राज्यातील इतर किल्ल्यांचे संवर्धन होत आहे, मात्र हा जलदुर्ग आजपर्यंत उपेक्षात राहिला आहे. समुद्र किनारी मौजमजा करण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी अलिबागला येतात. समुद्रस्नान करण्याबरोबरच पर्यटक कुलाबा किल्ल्यालादेखील भेट देतात. पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी येतात, परंतु त्यांना किल्ल्यातील मंदिराव्यातिरिक्त  काहीच पाहायला मिळत नाही. कारण या कुलाबा किल्ल्याची दुरावस्था झाली आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराचे मुख्यालय असणार्‍या ऐतिहासिक कुलाबा किल्ल्याची सध्या मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. समुद्राच्या लाटांच्या मार्‍यामुळे किल्ल्याची पूर्व आणि पश्चिम दिशेकडील तटबंदी ढासळत आहे. किल्ल्यात सर्वत्र झुडपे वाढली आहेत.  किल्ल्यातील तलावाचे पाणी शेवाळ परसरल्याने दूषित झाले आहे. गणेश मंदिरासमोरील दीपस्तंभ पडण्याची शक्यता आहे. किल्ल्यातील वाड्यांचे अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जुन्या तोफांची मोडतोड होत आहे. मुख्य दरवाजा नाही. या किल्ल्यात गोड्या पाण्याचे मोठे तलाव आहे. तसेच गोड्या पाण्याची विहिरही आहे. सध्या या तलावाचे पाणी वापरले जात नाही. त्यामुळे त्यात शेवाळ वाढले आहे. या तलावाचा उपसा करून त्यातील गाळ काढायाला हवा. या तलावात अनेक ऐतिहासिक वस्तू सापडू शकतात. या वस्तुंचे जतन करून त्यांचे संग्रहालय उभारता येईल. तलावातून काढलेला गाळ इतर ठिकाणी न टाकता किल्ल्यातील मोकळ्या जागेत टाकल्यास चांगले खत निर्माण हाईल. या परिसारत लॉन टाकून तेथे छोटीशी बाग तयार करता येईल. या बागेत पर्यटक बसू शकतील. बागेतील झाडांसाठी किल्ल्यातील तलावाच्या पाण्याचा वापर करता येईल. किल्ल्याच्या परिसरात वाढलेली झूडपे काढून परिसर स्वच्छ केला तर तेथे इतर झाडांची लागड होऊ शकते. किल्ल्यातील महल पडला आहे. तसेच काही इमारतीही पडल्या आहेत. त्या पुन्हा उभारता येणार नाहीत. ज्या भिंती उभ्या आहेत, त्या  इतिहासाच्या खुणा आहेत. त्या पुसल्या जाणार नाहीत, याची दक्षता घ्यायल हवी. किल्ल्याची तटबंदी ढासळत आहे. एकएक चिरा पडतोय. ही तटबंदी पुन्हा उभारावी लागणार आहे. ती उभारत असताना त्यात पाणी झिरपून पुन्हा ती ढासळणार नाही, यासाठी त्याचे वॉटरप्रूफींग करावे लागेल. तोफांचे व्यवस्थापन करावे लागेल. किल्ल्याचा इतिहास सांगण्यासाठी या किल्ल्यात ध्वनीप्रकाश (लाईट अ‍ॅन्ड साऊंड) योजना करता येईल. हा किल्ला पुरातत्व विभागच्या ताब्यात आहे. येथे काही सुधारण करायची असेल तर पुरातत्व विभागाची परवानगी घ्यावी लागते. पुरातत्व विभाग  केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा लागेल. सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज रघुजी राजे आंगे्र यांनी केंद्रिय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांची या संदर्भात भेट घेतली होती. त्यांनी किल्ल्याच्या परिस्थितीबाबत त्यांना अवगत केले होते.  किल्ल्याचे सवंर्धन आणि जतन तातडीने करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. हिबाब लक्षात घेऊन किल्ल्याच्या संवर्धनासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री महोदयांनी दिली आहे. हा निधी लवकर कसा प्रात्प होईल, यासाठी प्रयत्न करायाला हवेत. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या दुरुस्ती व संवर्धनासाठी केंद्र सरकारने 600कोटी रुपये दिले आहेत. मात्र मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र असलेला कुलाबा किल्ला अद्याप दुर्लक्षित राहिला आहे. रायगड किल्ल्याप्रमाणेच कुलाबा किल्ल्याचे संवर्धन व्हायला हवे. कुलाबा किल्ल्याचे संवर्धन केले गेले तर या किल्ल्याला वैभव प्राप्त होईल. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने समन्वय साधून काम केले पाहिजे. रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी जसा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, त्याप्रमाणे कुलाबा किल्ल्याच्या संवर्धनासाठीदेखील निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. या किल्ल्याचे संवर्धन केल्यास हा किल्ला जागतिक पर्यटनस्थळ होऊ शकेल.

-प्रकाश सोनवडेकर

Check Also

पेणमध्ये आज आमदार रविशेठ पाटील यांचे शक्तीप्रदर्शन

पेण ः प्रतिनिधी विधानसभेची लगबग सर्वत्र सुरू आहे. पेण मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री आमदार रविशेठ …

Leave a Reply