Breaking News

शिक्षण, मानसिक आरोग्याचा परीघ वाढवायला हवा

डॉ. आनंद नाडकर्णी यांचे प्रतिपादन

अलिबाग ः प्रतिनिधी

शिक्षण आणि मानसिक आरोग्य यांच्यात अभेद्य संबंध आहे. शिक्षण असो वा मानसिक आरोग्य दोघांचा परीघ वाढविला, तर ध्येयाकडे वाटचाल करता येऊ शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी येथे केले. विचार, भावना व वर्तन या तिन्ही घटकांवर शिक्षण आणि मानसिक आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे या तिन्ही घटकांत समतोल आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयात शिक्षक-पालक मार्गदर्शन सभेत बोलत होते.

या वेळी दत्ता खानविलकर एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष अमर वार्डे आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. राजीव धामणकर उपस्थित होते. मानसिक आरोग्य आणि शिक्षणाचा परस्पर संबंध, त्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संबंध याचे महत्त्व डॉ. नाडकर्णी यांनी या वेळी विषद केले. विचार भावना व वर्तन स्थिर असेल, तर मानसिक आरोग्य चांगले राहते. त्याचा शिक्षणासाठी तितकाच फायदा होतो. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन सतत तपासायला हवा. दृष्टिकोनाच्या बाबतीत सावध व प्रयोगशील असायला हवे. एखाद्या गोष्टीला तिसरी बाजूही असू शकते. तिचा शोध घेऊन तपासून पाहायला हवी. त्यामुळे मानसिक विकासालाही चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले.

जे शिक्षक मुलांच्या मनाची मशागत करू शकतात, त्यांच्यावर शिक्षणाचे संस्कार घडवू शकतात, त्यांना विद्यार्थी कधीच विसरू शकत नाहीत. सहशिक्षणातून विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते बहरत जाते. त्यामुळे शिक्षण पद्धती समृद्ध होते. शिक्षकांनी सहशिक्षणावर भर द्यायला हवा. भाषा हे संवादाचे माध्यम आहे. भाषेबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात असणारा न्यूनगंड शिक्षकांनी काढायला हवा. आकर्षक पद्धतीने विषय शिकवले, तर त्या विषयाची भीती दूर होते. त्यासाठी शिक्षकांनी शिक्षणाच्या शैलीत प्रयोगशीलता आणायला हवी, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply