कर्जत : बातमीदार
नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या कंटेनर सर्व्हेमध्ये कर्जत शहरात डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळून आले. त्यामुळे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक सर्व भागात फिरून नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करीत आहे. दरम्यान, नगर परिषदेतर्फे शहरात औषध फवारणी सुरु करण्यात आहे. शहरात डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळत असल्याची माहिती कर्जत उपजिल्हा रुग्णालयाकडून नगर परिषदेला देण्यात आली. त्यानंतर नगर परिषदेने तात्काळ शहरातील सर्व भागात कंटेनर सर्व्हे करण्यास सुरुवात केली. त्यात शहराच्या विविध भागात आतापर्यंत सुमारे 20 आढळून आले. त्यातील सर्वाधिक रुग्ण विठ्ठलनगर, महावीर पेठ आणि दहिवली भागातील असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे म्हणणे आहे. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक सुदाम म्हसे यांनी त्या भागात पाहणी केली. कर्जत शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने नगर परिषद सतर्क झाली आहे. नागरिकांना सूचना देण्यासाठी दवंडी देण्यास सुरूवात केली आहे. तसेच डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी कोणती खबदारी घ्यायला हवी, याविषयी परिपत्रक काढले आहे.
डेंग्यूचे डास हे स्वच्छ पाण्यावर वाढत असल्याने घरात आणि परिसरात पाणी साठवून ठेवू नये. कुलरमधील पाणी वारंवार बदलावे. डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास उपजिल्हा रुग्णालय आणि नगर परिषदेस संपर्क साधावा.
-अशोक ओसवाल, उपनगराध्यक्ष कर्जत नगर परिषद
डेंग्यूच्या आजारात ताप येतो, पेशी (प्लेटलेट्स) कमी होतात. त्या वेळी घाबरून जाऊ नये. त्या सर्वांनी तात्काळ नगरपालिकेला कळवावे आणि रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यावेत.
-सुवर्णा जोशी, नगराध्यक्ष, कर्जत