Breaking News

प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला वारकरी मंडळींचा पाठिंबा

नागोठणे : प्रतिनिधी

आंदोलन मागे घेतल्यावरच सकारात्मक चर्चा करू, असा हेका रिलायन्स व्यवस्थापनाने कायम ठेवला असल्याने आज बुधवारी (दि. 9) तेराव्या दिवसांपर्यंत प्रकल्पग्रस्थांच्या मागण्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी वारकरी संप्रदायाच्या शेकडो मंडळींनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्याने दुधात साखरच पडली असल्याची भावना आंदोलनकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.

नागोठणे येथील रिलायन्स कंपनीच्या विरोधात लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त, कायम, कंत्राटी तसेच निवृत्त कामगार आणि सुशिक्षित बेरोजगार यांच्या वतीने कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या सुरू आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय येथून उठायचेच नाही, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

आंदोलनकर्ते आणि रिलायन्स व्यवस्थापन यांच्यात काही बैठका झाल्या आहेत. त्यात आंदोलन मागे घेतल्यावरच सकारात्मक चर्चा केली जाईल, असे रिलायन्स व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. तर आंदोलनकर्ते आपल्या मागाण्यांपासून तसूभरही मागे हटले नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे बुधवारी तेराव्या दिवशीही प्रकल्पग्रस्तांचे रिलायन्स कंपनी विरोधातील ठिय्या आंदोलन सुरू आहे.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी रोहे, सुधागड व माणगाव तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या मंडळींनी आंदोलन स्थळी येवून प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला पाठिंबा  जाहीर केला.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply