वावंजे गावातील शेतकर्याचे कौतुक
खारघर : प्रतिनिधी
महाबळेश्वरमधील प्रसिध्द स्ट्रॉबेरीचे पीक पनवेल तालुक्यातील एका शेतकर्याने घेतले आहे. वावंजे गावातील सज्जन गोवर्धन पवार (वय 40) यांनी हा प्रयोग वावंजे परिसरातील श्री मलंगड डोंगराच्या पायथ्याशी सात गुंठे जागेत राबविला आहे. पनवेलची स्ट्रॉबेरी हा चर्चेचा विषय ठरला असून हा प्रयोग यशस्वी करणार्या शेतकर्याचे कौतुक होत आहे.
पनवेलमध्ये खांदेश्वर याठिकाणी भरलेल्या कृषी प्रदर्शनात जिल्ह्यातील महाड येथील शेतकर्याने हा प्रयोग राबविल्याची माहिती शेतकरी सज्जन पवार यांना मिळाली होती. त्यांनी प्रत्यक्ष संबंधित शेतकर्यांकडून स्ट्रॉबेरीच्या शेतीची माहिती घेऊन पनवेलमध्ये आपल्या शेतात हा प्रयोग राबविण्याचे निश्चित केले. याकरिता जागेची मशागत करून स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी आवश्यक असलेले मलचिंग बेड (गादीवाफे) तयार केले. याकरिता उभ्या आडव्या पद्धतीने 25 मायक्रोनाचे मलचिंग पेपर याठिकाणी लावले.
विदेशातुन भारतात आलेली स्ट्रॉबेरीची शेती महाराष्ट्रात महाबळेश्वर याठिकाणी प्रसिद्ध आहे. याठिकाणाहूनच वावंजे येथील शेतकरी सज्जन पवार यांनी 1000 रोपे पनवेलमध्ये आणली. विंटर डॉन आणि स्वीट चार्ली या जातीची हि रोपे आहेत. महाबळेश्वरला सात रुपये प्रति रोप जागेवर हे स्ट्रॉबेरीचे रोप पवार यांना मिळाले. नोव्हेंबर मध्ये त्यांनी या शेतीची लागवड केली. दरम्यान दोन वेळा अवकाळी पाऊस पडुनदेखील स्ट्रॉबेरीचा प्रयोग फलक यशस्वी झाल्याने पनवेलकरांना पनवेलची स्ट्रॉबेरी चाखायला मिळणार आहे.
सध्याच्या घडीला अनेक जण या शेती पाहण्यासाठी या जागेवर जात आहेत. स्ट्रॉबेरीसाठी थंड वातावरण लागते श्री मलंगड परिसरात वातावरण थंड असल्याने याठिकाणाचे वातावरणस्ट्रॉबेरीसाठी पोषक असल्याचे सिद्ध झाल्याने भविष्यात पनवेल मध्ये स्ट्रॉबेरीची शेती मोठ्या प्रमाणात घेता येऊ शकते.
येत्या 15 ते 20 दिवसांत स्ट्रॉबेरीची फळ पूर्णपणे पिकल्यावर त्यांची काढणी केली जाईल. स्ट्रॉबेरीला बाजारपेठेत चांगले महत्त्व असल्याने मॉल तसेच मोठ्या बाजारपेठेत स्ट्रॉबेरीची विक्री करण्याचा विचार शेतकरी सज्जन पवार यांचा आहे. पनवेलमध्ये पिकलेली हि स्ट्रॉबेरीची महाबळेश्वर पेक्षा जास्त गोड असल्याचा दावाही पवार यांनी केला आहे. स्ट्रॉबेरीच्या उत्तम वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश आणि 10-25 अंश सें. तापमान पोषक ठरते. परदेशातून आयात केलेल्या (कॅलिफोर्निया) जातींना सरासरी 30 अंश ते 37 अंश से. तापमान, 60 ते 70 टक्के हवेतील आर्द्रता आणि भरपूर सूर्यप्रकाश असे हवामान चांगले मानवते.
पनवेलमध्ये स्ट्रॉबेरीचा प्रयोग यशस्वी झाल्याने मी खुप आनंदित आहे. शेतकर्याने प्रयोगशील असावे या हेतूने मी हा प्रयोग राबविला. हा प्रयोग यशस्वी झाल्याने पनवेलमध्येदेखील स्ट्रॉबेरी पिकू शकते हे सिद्ध झाले आहे. तालुक्यातील इतर शेतकर्यांनीदेखील हा प्रयोग राबवावा.
-सज्जन पवार, स्ट्रॉबेरीचे शेती कारणारे शेतकरी, वावंजा गाव