
पनवेल : वार्ताहर
मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून 12 किलोमीटर अंतरावर कर्नाळा अभयारण्य आहे. शासनाने कर्नाळा किल्ल्याच्या परिसरातील 4.48 चौरस किलोमीटर क्षेत्र 1968 मध्ये पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. 50 वर्षांमध्ये येथील वनसंपदा व पक्ष्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होऊ लागली आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा पक्षी निरीक्षणासाठी योग्य कालावधी समजला जातो, यामुळे पर्यटकांची व पक्षी प्रेमींची गर्दी वाढू लागली आहे.
कर्नाळा अभयारण्यात पक्षी निरीक्षण हंगाम सुरू झाल्यामुळे पक्षी निरीक्षकांसह पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. 4.48 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या अभयारण्यात 642 प्रजातींचे वृक्ष आहेत, तर तब्बल 134 प्रजातींचे स्थानिक व 38 स्थलांतरित पक्षी पाहावयास मिळत आहेत.
पर्यटकांच्या सुविधेसाठी ठाणे वन्यजीव विभागाने विशेष व्यवस्था केली आहे. अभयारण्याच्या सुरुवातीलाच पक्ष्यांची माहिती कोणत्या परिसरात कोणते पक्षी सापडतील, याची माहिती देणारे फलक लावले आहेत. निरीक्षणासाठी रेस्ट हाऊस समोर, गोल प्लॅटफॉर्म, हरियाली ट्रेल, मोरटाका ट्रेल, हरियाली ट्रेल मध्यभाग, बर्ड वाचर्स पॉइंट, कर्नाळा किल्ला अशी सात ठिकाणे निवडली आहेत. पक्षिप्रेमींना वनविभागाचे अधिकारी व संयुक्त वनसमितीमध्ये काम करणारे, स्थानिक, गावांमधील कर्मचारी अभयारण्याची व पक्ष्यांचीही माहिती देत आहेत. राज्यातील प्रमुख पक्षी अभयारण्य म्हणून कर्नाळाची ओळख निर्माण झाली असून, ती टिकविण्यासाठी वनविभागाने विविध सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला प्रसाधनगृह, गेस्टहाऊस, पर्यटकांसाठी चेंजिंग रूम, बचतगटाच्या माध्यमातून जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
पर्यटनासाठी योग्य वेळ
कर्नाळा अभयारण्यामध्ये पक्षी निरीक्षणासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी ही योग्य वेळ आहे. सद्यस्थितीमध्ये वातावरण चांगले आहे. संपूर्ण परिसरात हिरवळ पसरली असून पक्षी निरीक्षणासाठी व पर्यटनासाठीही हीच योग्य वेळ असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचार्यांनी दिली आहे.