Breaking News

जेएनपीटीच्या मालवाहतूकीमध्ये 9.14 टक्क्यांची वाढ

उरण : वार्ताहर

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारतातील एक प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. जानेवारी महिन्यात जेएनपीटीमध्ये 465,084 टीईयूची (वीस फूट समकक्ष युनिट्स) मालवाहतूक करण्यात आली. जी मागील वर्षी याच महिन्यात केलेल्या हाताळणीच्या तुलनेत 9.14 टक्के अधिक आहे. नवीन वर्षाची सुरूवात व लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्याने देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याने ही वाढ झाली आहे.  

जेएनपीटीने जानेवारी 2021 मध्ये एकूण 6.50 दशलक्ष टन मालवाहतुकिची हाताळणी केली, तर जानेवारी 2020 मध्ये 5.91 दशलक्ष टन्स मालवाहतुकीची हाताळणी झाली होती. बल्क कार्गोच्या हाताळणीमध्ये सुद्धा मागील वर्षीच्या तुलनेत 38.98 टक्के वाढ झाली असून मागील महिन्यात 0.82 दशलक्ष टन बल्क कार्गोची  हाताळणी झाली आहे. याचबरोबर जानेवारी महिन्यात शॅलो वॉटर बर्थवर 134,713 मेट्रिक टन किनारपट्टीवरील सीमेंटची उच्चांकी वाहतूक करण्यात आली आहे. या अगोदर फेब्रुवारी 2019 मध्ये सर्वाधिक 113,560 मेट्रिक टन सीमेंट वाहतूकची नोंद झाली होती.

जेएनपीटीमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझामध्ये जानेवारी महिन्यात 51,163 ट्रॅक्टर ट्रेलरच्या माध्यमातुन 78,840 टीईयूची मालवाहतूक झाली.

जानेवारी महिन्यामध्येच जेएनपीटीने 60 मेट्रिक टन क्षमतेचा एक डेझी स्टार टग आपल्या ताफ़्यामध्ये समाविष्ट केला आहे. या टगच्या समावेशामुळे बंदरामध्ये विविध आकाराच्या मोठ्या जहाजांना हाताळण्यास मदत होईल व त्याद्वारे मोठी जहाजे हाताळताना अधिक सुरक्षा प्रदान केली जाईल. तसेच याच महिन्यात जेएनपीटीने रियल टाईम एअर क्वालिटी पॅरामीटर्सचे निरीक्षण करण्यासाठी पोर्ट ऑपरेशन सेंटर येथे वातावरणीय हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्र (उअअटचड) सुरू केले आहे. जेएनपीटीने महावितरणबरोबर वितरण फ्रॅन्चायझी करारावर स्वाक्षरी सुद्धा केली आहे, अशाप्रकारे वितरण फ्रॅन्चायझी करारावर स्वाक्षरी करणारे जेएनपीटी हे देशातील पहिले प्रमुख पोर्ट बनले आहे.

जेएनपीटीने निविदा नोटीस काढून जेएनपीटी सेझमध्ये औद्योगिक युनिट स्थापन करण्यासाठी आणि एसईझेडमध्ये अधिकृत ऑपरेशन्स सुरू करण्याच्या उद्देशाने 16 भूखंडांच्या वाटपासाठी ई-निविदा सह ई-लिलावाच्या माध्यमातून प्रस्ताव आमंत्रित केले आहेत. या सेझमध्ये गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी  जेएनपीटी खूप आशावादी आहे तसेच आम्हाला विश्वास आहे की जेएनपीटी सेझमध्ये आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार पायाभूत सुविधांचा विकास होत असल्याने भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनविण्यासाठी अग्रगण्य जागतिक कंपन्यांना याठिकाणी आकर्षित होतील.

यापुढेही जेएनपीटी देशाच्या आर्थिक विकासात योगदान देत राहील व बंदर क्षेत्राच्या वाढीचा मार्ग कायम ठेवण्यासाठी आपले कर्तव्य पार पाडेल.

जेएनपीटी कोव्हिड पूर्व कामगिरी पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे आणि यापुढेही ही वाढ अशीच कायम राहील. आम्ही बंदरामध्ये अनेक उपक्रम राबवित आहोत ज्यामुळे पोर्टची कामगिरी सुधारण्यास मदत झाली आहे. बंदर आधारित एसईझेडचा यशस्वीरित्या विकास करणारे जेएनपीटी हे देशातील पहिले बंदर आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जगातील अग्रगण्य कंपन्या जेएनपीटी सेझमध्ये गुंतवणूकीसाठी आकर्षित होतील. जेएनपीटी सेझचा डीपीआर सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. जेएनपीटी-सेझमध्ये चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 57 हजार प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणे अपेक्षित आहे.

-संजय सेठी, अध्यक्ष, जेएनपीटी

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply