Breaking News

सिडकोतर्फे सामाजिक व धार्मिक वापराच्या भूखंडांना अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकांस मंजुरी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडकोतर्फे शैक्षणिक, वैद्यकीय, संस्थात्मक, धर्मादाय किंवा शासकीय आणि धार्मिक वापराकरिता वाटपित करण्यात आलेल्या भूखंडांना अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याच्या निर्णयास नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबईच्या सामान्य विकास नियंत्रण नियमावलीतील (जीडीसीआर) अधिनियम क्र. 16.3(1अ)क मध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

सिडकोतर्फे नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये शैक्षणिक, वैद्यकीय, संस्थात्मक, धर्मादाय किंवा शासकीय कार्यालये आणि धार्मिक वापराकरिता भूखंड भाडेपट्ट्यावर वाटपित करण्यात आले आहेत. सदर भाडेपट्टाधारकांनी सिडकोकडे अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक देण्याची मागणी केली होती. परंतु अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक ज्या निकषांवर मंजूर करण्यात येतो त्या भूखंडाचा आकार, रस्त्याची रुंदी, वाहतुकीचा उद्भव, वाहतूक प्रवाह इ. निकषांची पूर्तता काही भूखंडांच्या बाबतीत होत नव्हती. याकरिता उपरोक्त निकषांच्या संदर्भात सिडकोतर्फे अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातील निष्कर्षांवर आधारित अतिरिक्त चटई निर्देशांक मंजूर करण्याबाबतचे धोरण सिडकोकडून आखण्यात आले. या धोरणाची कायदेशीरदृष्ट्या प्रभावी अंमलबजावणी करता यावी म्हणून त्यातील मार्गदर्शक तत्त्वे विकास नियंत्रण नियमावलीतील अधिनियम म्हणून समाविष्ट करण्यात आली आहेत व त्या अनुषंगाने उपरोक्त अधिनियमातील तरतुदींमध्ये काही बदल करण्यात

आले आहेत.

या निर्णयामुळे अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली असून उपरोक्त निकषांची पात्रता पूर्ण करणार्‍या भूखंडांना त्याचा लाभ मिळणार आहे. सदर सुधारित अधिनियमांना महाराष्ट्र शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच ते अंमलात येतील.

या निर्णयामुळे सामाजिक व धार्मिक वापराच्या भूखंडांकरिता अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकाचा लाभ मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होऊन त्याबाबतच्या निकषांची काटेकोरपणे पूर्तता करणार्‍या भूखंडांना त्याचा निश्चितच लाभ मिळणार आहे.

-डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको  

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply