अलिबाग : प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रायगड जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अनेक रुग्णांना उपचारादरम्यान रक्ताची गरज भासत आहे. ही गरज लक्षात घेऊन रेवदंडा येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने 24 जून रोजी अलिबागमध्ये पहिल्या टप्प्यातील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अलिबाग शहराजवळील कुरूळ येथील क्षात्रैक्य माळी समाज सभागृहात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 9 वाजता हे रक्तदान शिबिर सुरू होणार आहे. रायगड जिल्हा रक्तपेढीची रक्त साठविण्याची क्षमता मर्यादित असल्याने पहिल्या टप्प्यामध्ये 250 बॅग्ज रक्त संकलित केले जाणार आहे तसेच गरजेनुसार पुढील टप्प्यात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत.
याआधी प्रतिष्ठानमार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील विविध शिबिरांमधून सहा हजार 939 बॅग्ज आणि परदेशातील सिंगापूर येथील शिबिरातून 60 बॅग्ज रक्त संकलित करण्यात आले आहे.
दरम्यान, अलिबाग येथील रायगड जिल्हा रक्तपेढीचे डॉ. दीपक गोसावी व त्यांच्या सहकार्यांमार्फत रक्त संकलित केले जाणार आहे. हे रक्तदान शिबिर डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून संचारबंदीचे नियम पाळून व सुरक्षित अंतर राखून वेळापत्रकानुसार होणार आहे.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper