पनवेल : वार्ताहर
पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणार्या विविध योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन सभापती मोनिका महानवर यांनी केले आहे. या योजनांमध्ये शैक्षणिक शिष्यवृत्ती, खेळाडूंना आर्थिक मदत तसेच मुलांना दत्तक घेतलेल्या पालकांना आर्थिक मदत या योजनांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये शिष्यवृत्ती योजनेत वैद्यकीय शिक्षण घेणार्या एमबीबीएस विद्यार्थिनीसाठी एक लाख, बीएएमएस विद्यार्थिनीसाठी 50 हजार, बीएचएमएस विद्यार्थिनीसाठी 50 हजार प्रथमवर्ष वगळता प्रोत्साहनात्मक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. दुसरी योजना राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर वैयक्तिक, सांघिक कामगिरी करणार्या महिला खेळाडूंसाठी आहे. या योजनेत राज्यस्तरीय वयक्तिक खेळाडूंसाठी दहा हजार व संघासाठी 25 हजार तसेच राष्ट्रीय स्तरावर वयक्तिक खेळाडूंसाठी 25 हजार व संघासाठी 50 हजार आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. तिसर्या योजनेचा लाभ अनाथ व निराधार मुलींचा सांभाळ करणार्या पालकांना घेता येणार आहे. अनाथ मुलींना दत्तक घेणार्या पालकांसाठी प्रोत्सहात्मक रक्कम म्हणून 25 हजारांचे अनुदान पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाने काढलेल्या पत्रकात माहिती दिली आहे. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी हे परिपत्रक काढले आहे. महिला व बाल कल्याण विभागाच्या या योजना गरजुंसाठी लाभदायक आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी 10 मार्चपर्यंत या विभागात अर्ज करण्याचे आवाहन सभापती मोनिका महानवर यांनी केले आहे.