Breaking News

चौक येथील ग्रामीण रुग्णालयाची दूरवस्था

रुग्णांच्या जीवितास धोका

चौक : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील चौक ग्रामीण रुग्णालयाची दूरवस्था झाली असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना धोका निर्माण झाला आहे.
चौक ग्रामीण रुग्णालयाची अवस्था अतिशय धोकादायक आहे. या रुग्णालयात जवळपास 50 गावतील रुग्ण वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी येत असतात. शिवाय मुंबई-पुणे रस्त्यावरील अपघात, अथवा अपघातातील शवविच्छेदनदेखील याच रुग्णालयात होत आहे. येथील वैद्यकीय सुविधा, वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर, सर्व कर्मचार्‍यांची सेवा चांगल्या प्रतीची असल्याने रुग्णांचा ओढा जास्त आहे. ग्रामीण रुग्णालयाची सुमारे 30 फूट संरक्षण भिंत पडण्याच्या अवस्थेत आहे. ही भिंत पूर्णपणे कलंडली आहे. ही भिंत चौक विस्तरीत गावठाणकडे व ग्रामपंचायत चौक व तुपगाव कार्यालयात येणार्‍या मार्गावर आहे. त्यामुळे येणार्‍या जाणार्‍या नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण होऊ शकतो.
रुग्णालयात असणार्‍या प्रसाधन गृहाच्या भिंतीला तडे गेले असून रुग्णालयाच्या टाईल्स उखडलेल्या असून चालताना अनेक ठिकाणी लादीचा आवाज येत आहे. येथील ऑपरेशन थिएटरला सीलिंग पडले आहे. त्यामुळे येथे बाळंतपणाचे सिझरीन करू शकत नाही. ऑपरेशन थिएटरमधील साहित्यदेखील खराब होत आहे. कोरोना काळात बंद झालेले हे थिएटर आज मोडकळीस आलेल्या स्थितीत आहे. वैद्यकीयअधिक्षक हे महीला व बालरोगतज्ज्ञ असल्याने येथे सिझरिन होऊ शकते.
दवाखान्याच्या खिडक्या तावदाने पूर्णपणे निकामी झाली असून त्यांच्या काच फुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे काचाऐवजी कपड्याने गुंडाळून ठेवले आहे. या खिडक्यांची रूपरेषा जुनी असून नवीन पद्धतीच्या हवा खेळती ठेवण्यासाठी त्याठिकाणी लावाव्यात अशी चर्चा सुरू आहे. दवाखान्याची सांडपाणी व्यवस्थापन कोलमडले आहे, सांडपाणी गटारात येण्या ऐवजी तिथेच मुरत आहे. त्यामुळे डासांचा प्रादूर्भाव होऊ शकतो. दवाखान्याच्या आवारात सुकलेले गवत, पालापाचोळा जमलेला आहे.

वैद्यकीय सुविधा व सेवा चांगली असल्याने रुग्ण संख्या जास्त आहे, पण भविष्यात धोका दिसत असल्याने रुग्ण येतील की, नाही अशी चर्चा असून त्यांच्या अथवा कर्मचार्‍यांच्या जीविताला धोका निर्माण होण्यापूर्वी दवाखान्याचे काम होणे गरजेचे असून याबाबत आपण आमदार महेश बालदी यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती देणार आहे.
-राजू पाटील, सदस्य ग्रुप ग्रामपंचायत चौक

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply