Breaking News

पनवेल, उरणमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात

सीकेटी महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे कार्यक्रम

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे सोमवारी (दि. 8) जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमुख पाहुणे डॉ. प्रा. वसंत बहाटे यांनी, आधुनिक काळात मुलांवर संस्कार करण्याचे काम महिला उत्तमरितीने पार पाडतात, असे सांगून विविध उदाहरणे देत सहज सुंदर विचारांचे मार्गदर्शन केले आणि सर्व प्राध्यापिका व शिक्षकेतर महिला यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी प्राचार्य डॉ. प्रा. बहाटे यांनी सर्व महिलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागतही केले. महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. डॉ. रत्नप्रभा म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी जागतिक महिला दिनाचा उदय व त्याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, रूसाचे समन्वयक डॉ. शैलेश वाजेकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात 76 प्राध्यापिका आणि शिक्षकेतर महिला यांनी सहभाग घेतला. उपस्थिातांचे आभार डॉ. स्मिता भोईर यांनी मानले.

पनवेल तालुका पत्रकार महासंघाने केला संघर्षवादी महिलांचा सन्मान

पनवेल : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुका पत्रकार महासंघाच्या वतीने संघर्षवादी महिलांचा सन्मान सोमवारी (दि. 8) करण्यात आला. या कार्यक्रमास महासंघाचे अध्यक्ष व सा. रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील, ज्येष्ठ सल्लागार व दै. किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर, उपाध्यक्ष दीपक घोसाळकर, सचिव मयूर तांबडे, खजिनदार सुधीर पाटील, प्रसिद्धिप्रमुख नितीन देशमुख, अरविंद पोतदार, संजय कदम, राकेश पितळे, प्रदीप वालेकर, अनिल कुरघोडे, चंद्रशेखर भोपी उपस्थित होते. घरी मास्क तयार करून विकणार्‍या श्रद्धा विरेन पटेल (नवीन पनवेल), रिक्षाचालक सुगंधा बाळू धोत्रे (खांदा कॉलनी), चप्पल विक्रीचा व्यवसाय करणार्‍या उज्ज्वला कुंडलिक कारंडे (कळंबोली) यांना सन्मानित करण्यात आले. पतीच्या निधनानंतर तिन्ही महिला स्वतः कुटुंबाचे पालनपोषण करीत आहेत.

कौटुंबिक व सामाजिक अन्यायाविरुद्ध महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन

नवीन पनवेल : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून टीजेएसबी सहकारी बँक, नवीन पनवेल शाखेच्या वतीने महिलांसाठी कौटुंबिक व सामाजिक अन्यायाविरुद्ध कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (दि. 5) करण्यात आले होते. या कार्यक्रमात पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी उपस्थित बँकेच्या महिला ग्राहकांना, सामाजिक क्षेत्रातील कार्यरत असलेल्या महिलांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, समाजामध्ये अनेक असे महिला उद्योजिका आपला उद्योग उत्तम प्रकारे हाताळतात. आपला संसार, घरातील सर्व माणसे कुटुंबीय सर्व सांभाळूनसुद्धा उद्योगांमध्ये सुद्धा प्राविण्य मिळवतात. त्यासाठी लागणारे भांडवल हे आता बँकेमार्फत सहजतेने उपलब्ध होते. पाहायला गेले तर अमेरिकेमध्ये एक चळवळ सुरू झाली, तिथे महिलांना 12 तास काम करावे लागत होते. त्याच्याविरुद्ध त्यांनी आंदोलन पुकारले आणि त्यामध्ये त्यांना यश येऊन त्यांच्या कामाचा जो वेळ कमी झाला. त्याचा आनंद म्हणून त्यांनी जागतिक महिला दिन साजरा करू लागले. आपल्याकडे महिलादिन साजरा करण्यामागचा हेतू म्हणजे वेगळा, आपल्या येथे महिला शिकते, ती घराबाहेर पडते, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवून त्या समाजाला आणि देशाला सुद्धा पुढे नेतेे. पेण नगरपालिका परिषद माजी नगरसेविका ‘रायगडभूषण’ व ‘पनवेल गौरव’ सन्मानित, महिलांच्या कौटुंबिक अत्याचाराविरोधात तसेच बाल गुन्हेगार व त्यांच्या न्याय हक्कासाठी सतत कार्यरत असलेल्या पनवेलच्या अ‍ॅड. शुभांगी झेमसे (बाल न्याय मंडळ, रायगड महाराष्ट्र शासन सदस्य) यांनी कार्यक्रमामध्ये समाजातील महिलांना कौटुंबिक अन्याय व सध्याच्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये घटस्फोट घेण्याचे वाढते प्रमाण व त्यावर कायदेविषयक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात बँकेचे नवीन पनवेल शाखेचे सर्व कर्मचारी वृंद आणि महिला ग्राहक उपस्थित होत्या. शेवटी टीजेएसबी सहकारी बँक पनवेल शाखेचे स्टाफ प्रवीण वाघमारे यांनी आभार मानले.

खारघरच्या ब्ल्यू डार्ट कंपनीची महिलांकडे धुरा

खारघर : महिला दिनाच्या औचित्यावर ब्ल्यू डार्ट या हवाई आणि एकात्मिक दळणवळण आणि वितरण कंपनीने महिला दिनाच्या निमित्ताने एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून संपूर्ण केंद्रामध्ये केवळ महिलांना नेतृत्वाची संधी देऊन समाजापुढे एक नवीन आदर्श ठेवला आहे. अनेक वर्षांपासून लॉजिस्टिक उद्योग एका ठराविक साच्यात, पुरुषांचे वर्चस्व असल्याप्रमाणे चालत आहे. मात्र, या उद्योगातील हा दृष्टिकोन बदलण्यासाठी ब्ल्यू डार्ट आपल्या स्थापनेपासून म्हणजे अगदी 1983पासून लक्षणीय प्रयत्न करत आहे. नवी मुंबईतील खारघर येथे असलेल्या सर्व महिला सर्व्हिस सेंटरमध्ये सोळा उत्साही महिलांची टीम आहे. या महिला व्यवस्थापक, कस्टमर सर्विस रीप्रेझेंटेटिव्ह, सेक्युरिटी पर्सनल तसेच सेल्स आणि काऊंटर स्टाफ अशा विविध जबाबदार्‍या सांभाळत आहेत. याचबरोबर ही कंपनी बहुविधता आणि सर्वसमावेशकतेचा हा उपक्रम आणखी पुढे नेत आहे. ’एम्प्लॉयर ऑफ चॉईस’ या उपक्रमातून अधिकाधिक महिलांना ब्ल्यू डार्ट कुटुंबात समाविष्ट केले जाणार आहे आणि लवकरच खारघरच्या ऑल महिला सर्विस सेंटरप्रमाणेच अंधेरी येथे आणखी एक केंद्र सुरू केले जाणार आहे. कनेक्टिंग पीपल, इम्प्रुव्हिंग लाईव्ह्स’ या आपल्या उद्दिष्टासह ब्ल्यू डार्टने तीन मुख्य मुद्द्यांवर भर दिला आहे. गोग्रीन (पर्यावरणरक्षण), गोटिच (शिक्षणावर भर) आणि गोहेल्प (आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद). बहुविधता वाढवण्यावर अधिक भर देत असतानाच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच ब्ल्यू डार्टने महिला कुरिअर्ससाठी इलेक्ट्रिक व्हिइकल्स आणल्या. त्यांच्या सेवेमुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल, याची खातरजमा यातून केली गेली.

उरण महाविद्यालयात महिला दिन

उरण : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील महिला विकास कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा उपस्थित होते. कार्यक्रमात ज्येष्ठ प्रा. व्हि. एस. इंदूलकर, आ.क्यू.ए.सी समन्वयक प्रा. डॉ. पराग कारूळकर, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनूपमा कांबळे यांनी केले. या वेळी प्रा. हन्नत षेख, प्रा. लिफ्टन कुमारी व प्रा. मयुरी मढवी यांनी मनोगत व्यक्त करून महिलांचे कर्तव्य व सद्य परिस्थिती याविषयी विचार मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. आनंद गायकवाड यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. डी. पी. हिंगमिरे यांनी मानले. महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कोविड 19चे नियम पाळून कार्यक्रम झाला.

Check Also

मंत्री भरत गोगावले यांचे पनवेलमध्ये जोरदार स्वागत

आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्याकडून शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्त शिवसेनेचे महाडमधील आमदार भरत …

Leave a Reply