कठोर कारवाईची मागणी

पाली : प्रतिनिधी
राज्यात 23 जूनपासून प्लास्टिकबंदी लागू झाली. त्यानुसार सुरुवातीच्या काळात पाली ग्रामपंचायतीने प्लास्टिक वापरणार्या अनेकांना दंड ठोठावला होता. हळूहळू ही कारवाई शिथिल झाली. आता पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्यांनी डोके वर काढले आहे. त्या बाजारात सर्रास विकल्या व वापरल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने पुन्हा प्लास्टिक वापर व साठवणूक करणार्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सुधागड तालुक्यातील पालीत सध्या प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. पालीतील कचराकुंड्या व नाले तर प्लास्टिक पिशव्यांनी भरले आहेत. कचराकुंड्यातील प्लास्टिक खाऊन अनेक गुरांचे हकनाक बळी जात आहेत. शासनाने बंदी घातल्यानंतर पाली ग्रामपंचायतीमार्फत स्थानिक व्यापार्यांना प्लास्टिकबंदीच्या सूचना व पत्रके देण्यात आली होती. व्यापार्यांच्या बैठकाही घेण्यात आल्या. प्लास्टिक पिशव्या विक्रीसाठी ठेवणार्या दुकानदारांना दंडदेखील ठोठावण्यात आला. यानंतर काही काळ व्यापार्यांनी आपल्या दुकानातून प्लास्टिक काढून टाकले. नागरिकदेखील कापडी पिशव्या घेऊन बाजारात येताना दिसत होते, मात्र दोन-तीन महिन्यांपासून पुन्हा प्लास्टिक पिशव्या सर्वत्र दिसू लागल्या आहेत. चिकन, मटण व मच्छी यासाठी प्लास्टिक पिशव्या मिळू लागल्या. भाजीपाला व इतर वस्तू नेण्यासाठीही पालीत प्लास्टिक पिशव्या सहज मिळू लागल्या आहेत. दरम्यान, पाली ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा प्लास्टिकबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. प्लास्टिक वापरताना किंवा विकताना आढळणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. त्यामुळे पुन्हा पालीतील व्यापार्यांचे धाबे दणाणले आहेत. भाजी, मच्छी व मटण मार्केट तसेच इतर व्यापारी व दुकानदार ग्राहकांना प्लास्टिक पिशवी मागू नका, सोबत कापडी पिशवी घेऊन या, असे सांगत होते.
प्लास्टिक विकणार्या व्यापार्यांवर ग्रामपंचायतीने कारवाई केली आहे. त्यांचे व ग्रामस्थांचे प्रबोधनदेखील केले आहे. प्लास्टिक पिशव्या देणे बंद करण्यासंदर्भात व्यापार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्लास्टिकबंदीसाठी ग्रामपंचायतीने कडक कारवाई सुरू केली आहे.
-गणेश बालके, सरपंच, ग्रामपंचायत-पाली