Breaking News

द्रुतगती महामार्गावर कंटेनरची ट्रकला धडक

दोनही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली बायपासजवळ ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरने बुधवारी (दि. 10)पहाटेच्या सुमारास ट्रकला धडक दिली. त्यानंतर या दोन्ही वाहनांनी पेट घेतला आणि ही आग बोरघाटातील जंगलात पसरली. अग्निशमन दलाच्या पथकांनी ही आग नियंत्रणात आणली.

द्रुतगती महामार्गावरून कंटेनर (एमएच-46,बीएफ-7713) भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने जात होता. खोपोली बायपासजवळ ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरने लेन क्रॉस करून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या ट्रक (एमएच-12,एमव्ही-7004) ला धडक दिली. या अपघातात दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. ट्रकमध्ये तेलाने भरलेले ड्रम होते. त्यांनी पेट घेतल्याने महामार्गावर अग्नितांडव झाल्याचे दिसून येते. बघताबघता आग बोरघाटातील जंगलात पसरली. धुराचे लोट खोपोली व परिसरात पसरले होते.

ही आग विझवण्यासाठी खोपोली व आसपासच्या आणखी चार अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र बुधवारी पहाटे पाचवाजेपर्यंत ही

आग धुमसत होती. कंटेनरमधील मालही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply