नवी मुंबई : बातमीदार
ठाणे लोकसभा मतदारसंघात होणारी लढत ही कट्टर शिवसैनिक विरुद्ध गद्दार अशी असून, राजन विचारे हे चार लाख मतांनी विजयी होतील, असा विश्वास उपनेते विजय नाहटा यांनी व्यक्त केला, तर गद्दार आनंद परांजपे यांना जनताच धडा शिकवेल, अशी टीकाही त्यांनी केली. ते वाशी येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
ठाण्यातील लढत एकतर्फी असल्याने येथे मोठ्या नेत्यांची सभा घेतली नाही. युतीमधील प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी संपूर्ण नवी मुंबई पिंजून काढली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या बहिष्काराचा फटका सेनेला बसणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला, तर 27 एप्रिल रोजी पहाटे नवी
मुंबईत बावखळेश्वर मंदिराबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मंत्री सुभाष देसाई यांचे व्यंगचित्र काढलेली पत्रके वाटणार्यांना पकडण्यात आल्याचे नाहटा यांनी सांगितले. याबाबत तक्रार करण्यात आली असून निवडणूक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. पराभव समोर दिसू लागताच देवाधर्माच्या आधारे मते मागण्यात येत आहेत. मंदिरावरील कारवाई ही कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार करण्यात आली असून इतकेच होते तर शासकीय जमिनीवर मंदिर उभारायची काय गरज होती. हा धर्माच्या नावाखाली जमीन हडपण्याचा डाव होता. तो डाव फसल्याची टीका नाहटा यांनी केली.
मागील निवडणुकीत बोगस रेशनकार्ड आणि आधार कार्ड बनविण्याची कामे याच लोकांनी केली, असा आरोपही विजय नाहटा यांनी गणेश नाईक यांचे नाव न घेता केला.