Breaking News

शेअर बाजाराचा आणि देशाच्या विकासाचा काही संबंध आहे?

उत्पादन आणि सेवांमध्ये भारताने आत्मनिर्भर व्हावे, यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. स्वस्त भांडवलाच्या उपलब्धतेला त्या प्रयत्नांत अतिशय महत्त्व आहे. भारतात भांडवल स्वस्त होण्यासाठी भारतीयांच्या गुंतवणुकीच्या सवयीत काही बदल होण्याची गरज आहे. त्या बदलांकडे केवळ जोखीम म्हणून न पाहता विकासासाठीची अपरिहार्यता म्हणून पाहण्याची हीच वेळ आहे.

वाढत चाललेला मध्यमवर्ग आणि मुळातच प्रचंड लोकसंख्येमुळे सेवा आणि वस्तूंना असलेली मागणी भारतात कधी कमी होऊ शकत नाही. कोरोनाच्या गेल्या एका वर्षाच्या काळात मात्र ती बरीच कमी झाली, पण ती अभूतपूर्व अशी परिस्थिती होती. जगात अर्थव्यवस्थेच्या बाबतीत याकाळात सर्वत्र जे पाहण्यास मिळाले, तेच साधारण भारतातही घडले. पण जेव्हा या संकटाची तीव्रता कमी होण्याची लक्षणे दिसू लागली, तेव्हा भारतातील अर्थव्यवस्थेने तुलनेने लवकर उभारी घेण्यास सुरुवात केली. अनेक कंपन्यांच्या सेवा आणि उत्पादने लवकरच पूर्वपदावर येतील, अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत. म्हणूनच जीडीपीचे आगामी आकडे असो, परकीय गुंतवणूकदारांची गुंतवणूक असो की शेअर बाजारातील तेजी असो, याविषयीचा आत्मविश्वास व्यक्त होताना दिसतो आहे. अर्थात, हे सर्व होण्यासाठी सरकारला पॅकेज आणि अर्थसंकल्पाच्या माध्यमातून खर्च वाढविणे भाग पडले असून त्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर कर्ज घेणार आहे. सरकारने घेतलेली कर्जे दीर्घकालीन असली तरी त्याचे परिणाम या ना त्या मार्गाने देशाला सहन करावेच लागणार आहेत. अशावेळी काय केले तर सरकारला कमी दरांत कर्ज मिळू शकेल?

* भांडवल अधिक व्याजदराने का?

परकीय गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवर अवलंबून असलेल्या भारताच्या दृष्टीने हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. सेवा आणि उत्पादनांत भारत आत्मनिर्भर व्हावा, यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. भारतीय उद्योजकांचा त्यात फायदा असल्याने तेही सरकारच्या या योजनांचा फायदा घेत असून चीन आणि इतर देशांकडून येणार्‍या अनेक वस्तू आता भारतातच उत्पादित होऊ लागल्या आहेत. ज्या वस्तूंची आतापर्यंत आयात होत होती, त्या जर भारतातच तयार होऊ लागल्या तर, त्याला सरकारने अनुदान योजना (पीएलआय) आणि इतर मदतीची जोड दिली आहे. त्यामुळेच अशा कंपन्यांचे शेअर वर जाताना दिसत आहेत. एवढे सगळे होत असूनही भारतात उत्पादनाला मर्यादा आहेत, असे म्हटले जाते. त्याचे कारण समजून घेतले पाहिजे. ते कारण असे आहे की, भारतीय उद्योजक व्यवसायिकांना भांडवल अधिक व्याजदराने घ्यावे लागते. भारताच्या बाहेर चीन आणि युरोपमध्ये भांडवल स्वस्त असल्याने तेथील सरकारे आणि उद्योजक त्याचा फायदा घेऊ शकतात. मग प्रश्न असा उपस्थित होतो की, तेथे ते स्वस्त आहे तर भारतात ते का स्वस्त नाही? त्याचे अगदी सोपे उत्तर असे आहे की, चीन आणि युरोपमध्ये बँकेतून पैसा फिरत असल्याने आणि जनतेची बचत भांडवली बाजारासारख्या दीर्घकालीन जोखीम गुंतवणुकीत जात असल्याने तेथे व्याजदर खूपच कमी आहेत आणि आपल्या देशात तो तितका फिरत नसल्याने आपल्याला जास्त व्याजदरात जगावे लागते. भांडवलाच्या बाबतीत जगाने जे साध्य केले आहे, ते भारत करू शकणार नाही का?

* परकीय गुंतवणूकदारांचा वरचष्मा

या कळीच्या मुद्यावर सरकार आणि आपल्या देशातील उद्योजक विचार करतच आहेत. अगदी अलीकडे कोटक महिंद्रा बँकेचे आणि भारतीय उद्योजक महासंघाचे (सीआयआय) चेअरमन उदय कोटक यांनी फार महत्त्वाचे भाष्य केले असून त्यावर विचार करण्याची गरज आहे. भारतीय नागरिकांची बचत बँक एफडी आणि सोन्यामध्ये अधिक आहे. बँक एफडीचे व्याजदर कमी होत असले तरी जगाच्या तुलनेत ते अजूनही अधिक आहेत. या पार्श्वभूमीवर या बचतीचा काही वाटा जोखीम असलेल्या दीर्घकालीन गुंतवणुकीत गेला पाहिजे, असे कोटक यांना वाटते. आधुनिक जगात भांडवलाला अतिशय महत्त्व आहे. भारत सरकार किंवा उद्योजक यांना जेव्हा भांडवली बाजारातून भांडवल मिळवायचे असते, तेव्हा त्यांना परकीय गुंतवणूकदारांवर अवलंबून राहावे लागते. भारताच्या भांडवली बाजारावरील वरचष्मा कमी करण्यासाठीही देशी गुंतवणूकदारांनी पुढे सरसावण्याची गरज आहे, असे त्यांना म्हणावयाचे आहे. भारतातील ब्लू चीप कंपन्यांमधील अधिकाधिक हिस्सा परकीय गुंतवणूकदार घेत आहेत, याकडे त्यांनी आपले लक्ष वेधले आहे.

* उदय कोटक यांचे काय म्हणणे आहे?

बँक एफडीच्या व्याजावर गुजराण करणार्‍या ज्येष्ठ नागरिकांनी काय करावयाचे, भांडवली बाजारातील जोखीम कोण उचलणार, असे प्रश्न त्यांना लगेच विचारले जातील. पण अशा वेळी हे लक्षात घेतले पाहिजे, की ज्येष्ठांना या बदलाचा फटका बसू नये, याची काळजी सरकारने ज्येष्ठांना व्याजदराची हमी देऊन, आधीच घेतली आहे. (सरकारने सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये 7.4 टक्के व्याजाची हमी दिली आहे.) त्यामुळे कोटक यांनी ज्या गोष्टींवर भर दिला आहे, त्या आधी समजून घ्याव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे, सर्व जगात होणारा बदल आपला एक देश रोखू शकणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे परकीय गुंतवणूकदार त्यांची बचत वापरून भारतीय बाजारात पैसा कमावत असतील तर त्याचा फायदा भारतीय नागरिकांनी का घेऊ नये? तिसरी गोष्ट म्हणजे उद्योजक आणि सरकारचे परकीय गुंतवणुकीवरील अवलंबित्व कमी करण्याचा हाच एक चांगला मार्ग आहे. चौथी गोष्ट म्हणजे, हे सर्व लगेच केले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे नाही. त्यासाठीचे उत्तम व्यवस्थापन केले जावे, तसेच भांडवली बाजार अधिक विश्वासार्ह केला जावा, असेही त्यांनी म्हटले आहे. पाचवी गोष्ट म्हणजे, सध्या परकीय आणि जे मोजके भारतीय गुंतवणूकदार अशा गुंतवणुकीचा चांगला फायदा मिळवत आहेत, तो इतर नागरिकांनाही मिळावा, अशी रचना करण्यामध्ये चुकीचे काही नाही, ते करण्यात भारतीय पारंपारिक मानसिकता जर आड येत असेल तर ती बदलण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

* स्वस्त भांडवल – विकासाचा मार्ग

थोडक्यात, देशाचा विकास झाला पाहिजे, असे ज्यावेळी आपण म्हणतो, त्यावेळी त्यासाठीचे भांडवल भारतीय नागरिकांनी उभे केले पाहिजे आणि त्यासाठीच्या गुंतवणुकीचा परतावा भारतीय नागरिकांनाच मिळाला पाहिजे, अशी इच्छा असण्यात चुकीचे काही नाही. आता, ते जर प्रत्यक्षात आणावयाचे असेल तर त्यासाठीचा बदलही आपल्याला मान्य करावा लागेल. तो बदल म्हणजे दीर्घकालीन जोखीम असलेली गुंतवणूक मान्य करणे. ही गुंतवणूक सरकार किंवा उद्योजकाला भांडवली बाजारातून भांडवल उभारण्यास मदत करते. असे भांडवल उद्योग उभारण्यासाठी आणि देशातील पायाभूत सार्वजनिक सेवासुविधा वाढविण्यासाठी वापरले जाते. अशा प्रकारच्या भांडवलाच्या मार्गानेच विकसित देशांनी आपला विकास साधला आहे आणि तेच आपल्याला करावे लागणार आहे.

* ग्रोथस्टोरीवर आपला विश्वास का नाही?

भांडवली बाजार म्हणजे शेअर बाजार, हे खरे असले तरी वरील विचार करताना त्याविषयीच्या गैरसमजांतून आपल्याला आधी बाहेर पडावे लागेल. आज या बाजारात भारतीय गुंतवणूकदारांची संख्या खूपच कमी म्हणजे पाच ते सहा कोटींच्या घरात असल्याने (त्यातील एक कोटी तर कोरोनाच्या गेल्या वर्षभरातील आहेत.) त्यावर वर्षानुवर्षे परदेशी गुंतवणूकदार राज्य करतात. भारतातील प्रचंड लोकसंख्या आणि विकसनशील देश या नात्याने गुंतवणुकीच्या प्रचंड संधी आहेत, हे जगातील गुंतवणूकदारांनी हेरले आहे. त्यामुळे कोरोनाच्या या अभूतपूर्व वर्षांतही त्यांनी भारतात भरभरून पैसा ओतला आहे आणि अजूनही ओतत आहेत. त्यामुळेच अर्थचक्र पूर्वपदावर आले नसताना भारतीय भांडवली बाजाराचे मूल्य वर्षभरात दुप्पट झाले आहे. (200 लाख कोटी रुपये) भारताच्या अर्थव्यवस्थेला अशा कठीण काळात बळकटी मिळण्यास त्याचा चांगलाच उपयोग झाला आहे. याचा अर्थ भारताच्या ग्रोथ स्टोरीवर परकीय गुंतवणूकदारांचा विश्वास आहे. मग त्या देशाचे नागरिक या नात्याने आपला विश्वास का नाही, हा खरा प्रश्न आहे.

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply