आजचे जागतिक अर्थकारण आणि भारताची आर्थिक स्थिती, याचा फायदा भारताला होताना दिसतो आहे. त्यामुळे धाडसाने चांगल्या कंपन्यांत गुंतवणूक करणे चालूच ठेवले पाहिजे. अशा चांगल्या कंपन्या म्हणजे नेमक्या कोणत्या कंपन्या हे या तिसर्या भागात समजून घेऊयात.
इन्टेरेस्ट कव्हरेज गुणोत्तर – हे एक कर्ज गुणोत्तर आणि नफा-गुणोत्तर प्रमाण आहे जे कंपनी आपल्या थकित कर्जावर किती सहज व्याज देऊ शकते हे निर्धारित करण्यासाठी वापरले जाते. कंपनीचं व्याज व करपूर्व उत्पन्नास त्याच कालावधीतील व्याज रकमेनं भागल्यास हे गुणोत्तर मिळू शकतं. हे गुणोत्तर जितकं जास्त तितकी ती कंपनी व्याज देण्यास सक्षम असं दर्शवत असलं तरी हे गुणोत्तर प्रत्येक क्षेत्रानुसार कमी अधिक होत असतं त्यामुळं एकाच क्षेत्रातील दोन कंपन्यांच्या बाबतीत याबाबत तुलना होऊ शकते. अशा कंपन्या प्रतिकूल परिस्थितीत नेहमीच तरल्या जाऊ शकतात. कारण जरी कंपनीद्वारे उत्पादन होऊ शकले नाही, पर्यायानं विक्रीमध्ये घट आणि परिणामी नफ्यात तूट आली तरी कर्जावरील व्याज देऊ करायचं नसल्यानं कंपनी अशा परिस्थितीत टिकाव धरू शकते.
Low Debt companies – हे झालं कर्ज असलेल्या कंपन्यांच्या बाबतीत. परंतु अशा अनेक चांगल्या कंपन्या आहेत ज्यांच्यावर अजिबात कर्ज नाही. त्यामुळं ही गोष्ट सर्वांत महत्त्वाची.
किंमत/उत्पन्न गुणोत्तर (P/E)- काही लोक कंपन्यांचे यास वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देऊन ठेवताना दिसतात. जास्त पी/ई म्हणजे तो शेअर महाग आणि म्हणून तो घ्यायचा नाही याला मी फारसं महत्त्व देत नाही. याचं व्यवहारिक उदाहरण द्यायचं झालं तर कपड्यांचं देता येईल. फॅशन स्ट्रीटवर 700 रुपयांमध्ये जीन्स मिळते, परंतु तीच जीन्स गूची, गेस, डीजी असे महागडे फॅशन ब्रँड्स सोडले तरीदेखील युसीबी, लिवाईज अशा ब्रॅण्डच्या जीन्स 5000 रुपयांच्या पुढेच मिळतात. म्हणून ब्रँडेड जीन्स घायच्याच नाहीत का? तर फरक हा त्यातील गुणवत्तेचा असतो. जसा कपड्यांमध्ये कम्फर्ट, वस्तूंमध्ये टिकाऊपणा महत्त्वाचा असतो तसाच (पी/ई नुसार) महागड्या कंपन्यांच्या शेअर्समध्येदेखील त्यांची दीर्घकालीनता/सचोटी महत्त्वाची ठरते आणि अशा कंपन्यांचे पी/ई हे चढेच असतात. (उदा. इन्फो एज, ज्युबिलंट फूड, टायटन, डिक्सॉन, इ.)
आता वरील सर्व गोष्टी ह्या कंपनीचा मूलभूत विश्लेषण या प्रकारात मोडतात आणि अशा बाबी तपासून आपल्याला कोणती कंपनी उत्तम मूल्य असलेली आहे हे ठरवता येऊ शकते, परंतु गुंतवणूकदारांना सतावणारी यापुढील गोष्ट म्हणजे चांगल्या कंपन्यांचे शेअर्स नक्की कोणत्या भावात खरेदी करायचे? यासाठी माझं पाहिलं उत्तर आहे कोणत्याही भावात सुरुवात तरी करा. कारण शेअर बाजार हे असं ठिकाण आहे जिथं लोकांना कंपन्यांचे भाव तोंड-पाठ असतात, परंतु त्यांचं मूल्य ठाऊक नसतं आणि त्यामुळेच प्रत्येक भावात व्यवहार होत असतात. कोणाला उच्चतम भावात खरेदी करून अधिक उच्चतम भावात विकण्याची खुमखुमी असते तर नीचांकी भाव अजून खाली जातील या भयानं अशा पडेल भावात विकणारेदेखील आढळतात. एक वाक्य इथं नमूद करावं वाटतं, wrong company at right price you may survive but a right company at wrong price you will never survive.
उदाहरणंच द्यायची झाली तर, आयटीसी – 2017 यामधील 367 रुपयांचा उच्चांक अजूनही इतिहास बनून राहिलाय जरी बाजारानं नवनवीन उच्चांक नोंदवले आहेत. अजून काही तेव्हाच्या चांगल्या कंपन्यांची उदा. (भेल – उच्चांक 387, आज 54; बँक ऑफ बरोडा – उच्चांक 228, आज 77; एनटीपीसी – उच्चांक 242, आज 108.) इथं खराब कंपन्या किंवा ज्या कंपन्यांमध्ये घोटाळे झाले अशा कंपन्या टाळल्या आहेत (उदा. पीएनबी, रिलायन्स पॉवर, रिलायन्स कॅपिटल, सुझलॉन, किंगफिशर, इ.).
त्यामुळं आपण निवडलेल्या कंपन्यांचे शेअर्स हे कधी घ्यायचे याचा साधारणपणे अंदाज आपण तांत्रिक विश्लेषणाच्या अभ्यासानं लावू शकतो. जरी हा विषय खूप सूक्ष्म आणि किचकट असला तरी पडत्या बाजारात ढोबळमानानं खरेदी भाव ठरवण्यासाठी काही गोष्टी सहजपणे जाणून घेता येऊ शकतात आणि यासाठी मोठ्ठाल्ली फी भरून कोणताही क्लास करण्याची किंवा महागडं सॉफ्टवेअर तुमच्याकडं असण्याची गरज नाही. मी तपासात असलेल्या सर्व गोष्टी in.tradingview.com किंवा investing.com या संकेतस्थळांवर मोफतपणे उपलब्ध आहेत.
जास्त खोलात न शिरता, सर्वप्रथम सर्च बारमध्ये कंपनीचे नांव टाकून त्या कंपनीचा आलेख उघडावा. त्या आलेखाला वरळश्रूचार्ट (याचा अर्थ एक कॅण्डलस्टिक ही एका दिवसातील भावाची हालचाल दर्शवते) मध्ये सेट करून त्यानंतर ऍव्हरेज किंवा मूव्हिंग ऍव्हरेज हा स्टडी निवडून त्यास 200 मूल्य लावावे म्हणजे आलेखावर उमटलेली रेषा ही त्या शेअरच्या 200 दिवसांच्या भावाची चलत सरासरी दर्शवेल. आता ही झाली मांडणी. कोणत्याही कंपनीच्या शेअरचा भाव या 200 वाल्या मूव्हिंग ऍव्हरेजच्या खाली असेल तर तो भाव अजून खाली येऊ शकतो असा प्राथमिक अंदाज काढता येतो. म्हणजेच जर एखाद्या दिवसाचा बंद भाव त्या रेषेपेक्षा वर राहिल्यास ह्या शेअरचे भाव मागील 200 दिवसांच्या सरासरीच्या वर असल्यामुळं तेजीची संभावना वाढते. हा झाला अगदी प्राथमिक अंदाज जो तांत्रिकी विश्लेषण माहीतच नसलेल्याना उपयोगी ठरू शकतो.
अशाप्रकारे आपण मूलभूत विश्लेषणानं चांगल्या कंपन्या निवडू शकतो तर तांत्रिकी विश्लेषणाच्या आधारे खरेदी पातळी निश्चित करू शकतो.
सुपरशेअर : न्यू इंडिया अॅश्युरन्स
मागील लेखात उल्लेखल्याप्रमाणं सरकारी कंपन्यांच्या हिस्सा विक्रीऐवजी त्यांचं खाजगीकरण करण्याच्या प्रस्तावामुळं सरकारी कंपन्यांचे शेअर्स पळू लागले आहेत. गेल्या आठवड्यात न्यू इंडिया ऍश्युरन्स या 85 टक्के सरकारी हिस्सा असणार्या विमा कंपनीच्या शेअरचे भाव एका आठवड्यात सुमारे 17 टक्क्यांहून अधिक वाढले. शुक्रवारी नफा वसुलीमुळं हा शेअर 11 टक्के वाढ नोंदवून बंद झाला. कंपनीचं किंमत उत्पन्न गुणोत्तर 17 असून कंपनीची पुस्तकी किंमत 140 रुपये आहे. कंपनी जवळपास ऋणमुक्त आहे. कंपनी मोटार विमा, ग्रामीण विमा, आरोग्य विमा, प्रवासी विमा, सागरी विमा या प्रकारात सेवा देत असून इतर विम्यांमध्ये वैयक्तिक अपघात विम्याव्यतिरिक्त कचेरी विमा व दुकानदारांसाठी विमा या कंपनीच्या आगळ्यावेगळ्या योजना आहेत. कंपनीची व्याप्ती जगभरातील 28 देशामध्ये असून कंपनीनं 11.5 टक्के वाढ नोंदवली आहे. एकूणच विम्याबद्दल वाढती जागरूकता आणि प्रतिसाद पाहता दीर्घकाळासाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये असावी अशीच ही कंपनी आहे. कंपनीनं लाभांशाद्वारेदेखील आपल्या भागधारकांना उत्पन्न दिलेलं आहे. दैनिक तक्त्यावर 170-180 रुपयांदरम्यान अडथळा संभवत असून दीर्घावधीसाठी 260 व 320 रुपयाचं लक्ष्य ठेवण्यास हरकत वाटत नाही.
-प्रसाद ल. भावे(9822075888), sharpfinvest@gmail.com