Breaking News

शिवपुण्यतिथीनिमित्त हजारो शिवभक्तांचे किल्ले रायगडावर अभिवादन

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि परिसरातील प्रकल्पांसाठी शासन प्रयत्नशील -ना. मंगलप्रभात लोढा

महाड : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 343व्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर गुरुवारी (दि. 6) हजारो शिवभक्तांनी अभिवादन केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी त्यांनी किल्ले रायगडासह इतर गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि परिसरातील शिवसृष्टीसारख्या प्रकल्पांसाठी शासन प्रयत्नशील असून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही दिली.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासमवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार भरत गोगावले, माजी आमदार धैर्यशील पाटील, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी शिवसमाधी आणि जगदीश्वर मंदिर दीपवंदना, पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या मुलाखती (राजसभेत), शाहीर किरणसिंग सुरज राऊळ जळगाव यांचा ही रात्र शाहिरांची हा शाहिरी कार्यक्रम तसेच श्री जगदिश्वर मंदिरात हरिजागर असे कार्यक्रम झाले, तर दुसर्‍या दिवशी पहाटे श्री जगदिश्वर पूजा, श्री हनुमान जन्मोत्सव, त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा, राजदरबार येथे श्री शिवप्रतिमा पूजन करण्यात आले.
या वेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केल्यामुळेच महाराजांची किर्ती जगभरात असल्याचे म्हटले. त्यांनी पुढे बोलताना अफजलखान वधाची प्रतिकृती प्रतापगडावर उभी केली जाणार असल्याचे सांगितले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply