Breaking News

‘त्या’ तरुणाच्या आत्महत्येबाबत पालकांकडून संशय

पनवेल ः बातमीदार

उलवे सेक्टर 20 भागातील फ्लॅटमध्ये 5 डिसेंबर रोजी नेरूळमध्ये राहणार्‍या अभिदीप दीपक काळे (28) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे, मात्र अभिदीपने आत्महत्या केली नसून त्याच्यासोबत कामाला असलेल्या पूजा नामक तरुणीने त्याची अन्य सहकार्‍यांच्या मदतीने हत्या केल्याचा आरोप अभिदीपच्या पालकांनी केला आहे. अभिदीपच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पूजावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही अभिदीपच्या पालकांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडे केली आहे. नेरूळ सेक्टर 10 भागात राहणार्‍या अभिदीप काळे या तरुणाने दोन महिन्यांपूर्वी व्यवसाय सुरू केला होता. त्यासाठी त्याने नेरूळ आणि उलवे भागात फ्लॅट घेऊन तेथून व्यवसाय सुरू केला होता. उलवे येथे पूजा नामक तरुणी काम करत होती. यादरम्यान अभिदीप आणि पूजा या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले, मात्र पूजाचे इतर तरुणांसोबतही प्रेमसंबंध असल्याचे अभिदीपला समजल्यानंतर या दोघांमध्ये भांडण होण्यास सुरुवात झाली. 5 डिसेंबरला रात्री पूजा आणि अभिदीप उलवे सेक्टर 20मधील फ्लॅटमध्ये दारू पिण्यास बसल्यानंतर त्यांच्यामध्ये पुन्हा भांडण झाले. त्यानंतर रात्री 12च्या सुमारास पूजा निघून गेल्यानंतर अभिदीप फ्लॅटमध्ये एकटाच होता. त्यानंतर पूजा पहाटे तीनच्या सुमारास उलवे येथील फ्लॅटमध्ये परतल्यानंतर तिला अभिदीप गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्याचे पूजाने अभिदीपच्या वडिलांना फोनवरून कळवले. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे, मात्र अभिदीपने आत्महत्या केली नसून त्याची नियोजनपूर्वक हत्या केल्याचा आरोप अभिदीपच्या पालकांनी केला आहे. पूजा विवाहित असताना तिने अभिदीपसोबत प्रेमाचे नाटक करून त्याला लग्नाचे आमिष दाखविले. स्वत:ची मौजमजा करण्यासाठी पूजाने अभिदीपला मारहाण करून त्रास दिला. अभिदीप कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने पूजाला पैसे देणे कमी केल्याने पूजाने अभिदीपची हत्या केल्याचा आरोप अभिदीपचे वडील दीपक काळे यांनी केला आहे. अथवा पुजाने त्याचा शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले असावे, अशी शक्यता व्यक्त करत पोलिसांनी तपास करून अभिदीपच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पूजावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply