Breaking News

उरण पंचायत समितीत अपंगांची गैरसोय

उरण : वार्ताहर

उरण पंचायत समितीच्या अधिकार्‍याच्या मनमानी कारभारामुळे गेले अनेक वर्षे अपंग समाज कल्याण विभागाचे टेबल पहिल्या माळ्यावर ठेवले आहे. त्यामुळे उरणमधील अपंगांची गैरसोय होत असल्याने अपंग बांधवांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

उरण पंचायत समितीच्या माध्यमातून उरणच्या जनतेला अनेक योजनांचा लाभ घेता यावा यासाठी 15 पेक्षा जास्त टेबल तळमजल्यावर आहेत. तसेच पहिल्या मजल्यावर अधिकार्‍यांच्या माध्यमातून काम चालू आहे. यामध्ये अपंग समाज कल्याण विभागाचे काम करणार्‍या अधिकार्‍यांचा टेबल हा पहिल्या माळ्यावर आहे. उरणमध्ये अपंगांची संख्या ही 1372 एवढी आहे. यामधील साठ टक्क्यांपेक्षा जास्त अपंग हे 50 टक्के अपंग आहेत, मात्र पंचायत समितीमधील अपंगांना लाभ देणार अपंग समाज कल्याण विभागाचा टेबल हा पहिल्या माळ्यावर असल्याने अपंग  बांधवांना वर चढणे कठीण होत आहे. त्यामुळे अपंग बांधवांची गैरसोय होत आहे.

ही समस्या अनेक वेळा अपंग बांधवांनी पंचायत समितीतील वरीष्ठ अधिकार्‍यांना तोंडी आणि लेखी निवेदनाद्वारे कळविली होती, मात्र त्यांच्या या समस्येकडे अधिकार्‍यांनी कानाडोळा केला आहे. त्यांची ही समस्या लक्षात घेता पहिल्या माळ्यावर असणारा अपंग समाज कल्याण विभागाचा टेबल हा तळमजल्यावर आणण्यात यावा, अशी मागणी अपंग बांधवांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची गैरसोय होणार नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

आम्ही अपंग समाज कल्याण विभागाचा टेबल आणावा यासाठी अनेक वेळा गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन कळविले होते, मात्र आमची ही समस्या त्यांनी कधीच जाणून घेतली नाही. उलट आम्हाला उडवा उडवीची उत्तरे दिली. हा टेबल जर खाली घेतला तर आमची गैरसोय दुर होईल.

-सुनील केणी, अध्यक्ष, भाजप दिव्यांग सेल, उरण

समाज कल्याण विभागाचा टेबल लवकरात लवकर तळमजल्यावर   आणण्यात  येईल

-निलम गाडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, उरण

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply