Breaking News

बडतर्फ कामगारांना कामावर घेण्यासाठी कंपनी अधिकारी, कर्मचार्यांना रोखले

धाटाव एमआयडीसीतील घटना

रोहा : प्रतिनिधी

बडतर्फ कामगारांना आठ दिवसांत कामावर घेण्याचे मान्य करूनही सॉल्वे कंपनी व्यवस्थापनाने या कामगारांना कामावर न घेतल्याने बहुजन समाज औद्योगिक समन्वय संस्था व धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कामगारांनी एकत्रित येऊन  गुरुवारी (दि. 4) सकाळी ठेकेदारी व कायमस्वरूपी कामगारांना कंपनीत जाण्यापासून रोखले व रात्रपाळीला असलेल्या अधिकार्‍यांना कंपनीबाहेर जाऊ दिले नाही. त्यामुळे कंपनीसमोरील वातावरण तंग झाले होेते. रोहा पोलीस निरीक्षक परदेशी यांनी या वेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील सॉल्वे कंपनीने कायमस्वरूपी 10 कामगारांना अचानक कामावरून काढले आहे. आपल्याला कामावर घ्यावे यासाठी त्यापैकी पाच कामगार गेल्या 44 दिवसांपासून कंपनीसमोर उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला औद्योगिक परिसरातील सर्वच कामगारांनी पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, कंपनी व्यवस्थापन अधिकारी अनिल तस्ते यांच्याबरोबर 27 मार्चला झालेल्या चर्चेत बडतर्फ कामगारांना कामावर घेण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने आठ दिवसांची मुदत मागितली होती. या वेळी बहुजन समाज औद्योगिक समन्वय संस्थेचे अध्यक्ष सुरेश मगर, सरचिटणीस सतीश भगत, अरविंद मगर, माजी सरपंच ज्ञानेश्वर साळुंके, वरसे सरपंच रामा म्हात्रे, उपसरपंच अमित मोहिते आदी उपस्थित होते, मात्र ही मुदत संपल्यानंतरही व्यवस्थापन बडतर्फ कामगारांना कामावर घेण्यास चालढकल करीत असून, अजून दोन दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी बहुजन समाज औद्योगिक समन्वय संस्था व औद्योगिक क्षेत्रातील सर्व कामगारांनी सॉल्वे कंपनीच्या कायम आणि कंत्राटी कामगारांना कामावर जाण्यापासून रोखले. या वेळी कंपनी परिसरात तणाव निर्माण झाला. यावेळेपासून कंपनी गेटवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या वेळी औद्योगिक समन्वय संस्थेचे अध्यक्ष सुरेश मगर, सेक्रेटरी सतीश भगत, औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष विलास भगत, उपाध्यक्ष उत्तम नाईक, भाजप नेते संजय कोनकर, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे, माजी तालुकाप्रमुख विष्णू लोखंडे, युवा सेना उपाध्यक्ष श्रीकांत जंगम, कामगार नेते मोहन पवार, धाटाव उपसरपंच यशवंत रटाटे, वरसे सरपंच रामा म्हात्रे, उपसरपंच अमित मोहिते, किल्ला सरपंच दिनेश बामुगडे, तळाघर सरपंच संदेश मोरे, रोठ माजी सरपंच ज्ञानेश्वर साळुंके, शंकरराव भगत, अरविंद मगर, विठ्ठल मोरे, चंद्रकांत भगत, विलास डाके, संदीप मगर, अशोक निकम, वैभव घाणेकर, सुधीर भोकटे, परशुराम भगत, चंद्रकांत भोकटे, मुकेश भोकटे व कामगार उपस्थित होते.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply