मुंबई ः प्रतिनिधी
मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी (दि. 28) विस्कळीत झाली होती. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तब्बल 45 मिनिटे वाहतूक उशिराने सुरू होती. मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प आणि विस्कळीत झाल्याने कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत होती.
कल्याण, डोंबिवलीहून दररोज हजारो प्रवासी सीएसएमटीच्या दिशेने प्रवास करतात. रेल्वेच्या या खोळंब्याचा सीएसएमटीकडे येणार्या लोकल सेवेला फटका बसला. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. काही दिवसांपूर्वी कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. डोंबिवलीहून मुंबईच्या दिशेने येणार्या लोकल सेवेवर याचा परिणाम झाला होता.