आमदार मंदा म्हात्रे यांची आयुक्तांसोबत चर्चा
नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कंपन्या, कार्यालये, संस्था, सोसायट्या यांच्यामार्फत होणारा विजेचा वाढता वापर पाहता विजेचा भार कमी व्हावा, याकरिता सदर कंपन्या, सोसायट्यांनी सौरऊर्जेचा वापर करण्याचे आवाहन महापालिकेने करावे. तसेच सौरऊर्जेचा वापर केल्यास नागरिकांना महापालिकेच्या मालमत्ता करात सवलत देण्याबाबत बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.
या वेळी आयुक्तांनीही सकारात्मक निर्णय घेत ही कल्पना चांगली असून महापालिकेमार्फत योग्य कार्यवाही करण्याचे संकेत दिले. तसेच मतदारसंघातील नागरी समस्यांविषयीही या वेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले कि, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक मोठ्या कंपन्या व सोसायट्यांमधून विजेचा होणारा वाढता वापर लक्षात घेता विजेचा भार कमी करण्याकरिता सौरऊर्जेचा वापर करणे गरजेचे झाले आहे. दैनंदिन जीवनात सौर उपकरणांचा जास्तीत जास्त वापर केला, तर कमी खर्चामध्ये बरीचशी कामे पार पाडली जाऊ शकतात. नवी मुंबईमध्ये अनेक मोठ्या खाजगी इमारती व सोसायट्या असून या मोठ-मोठ्या सोसायट्यांनी सौरऊर्जेचा वापर केल्यास विजेचा पडणारा भार हा कमी होण्यास मदत होईल. महापालिका प्रशासनाकडून सोसायट्यांना याबाबत आवाहन केल्यास तसेच सौरऊर्जेचा वापर करणार्या नागरिकांना मालमत्ता करामध्ये सूट दिल्यास नागरिकांकडून प्रतिसाद मिळू शकेल.
अनेक क्षेत्रात सौरऊर्जेचा वापर करण्याचा कल वाढत असून महापालिका प्रशासनाकडून याबाबत धोरण तयार करून योजना उपलब्ध केल्यास याचा लाभ नागरिकांसह महानगरपालिकेलाही होणार आहे. आयुक्तांनीही सदरबाबत हिरवा कंदील दिला असून येत्या दोन दिवसांत सदरबाबत पत्र काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.