कंटेनमेंट झोनमध्ये 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई शहरात कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये वाढ होत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचित केलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जावे, अन्यथा कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
शहरातील चित्रपटगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, आदी ठिकाणी मास्क, सोशल डिस्टन्स, हॅन्ड सॅनिटायझर आदी सुविधांची उपलब्धता करण्यात यावी. नियमांचे उल्लघंन झाल्यास संबंधित चित्रपटगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, आदींवर कोरोना संपेपर्यंत पूर्णतः बंदी घालण्यात येणार असून, दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
शहरात कोणताही सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकीय कार्यक्रम राबविण्यास बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभासाठी 50 व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती नसाव्यात तसेच अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
गृह विलगीकरणाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे तसेच आरोग्य विभागाशी संबंधित सेवा तसेच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व कार्यालये सेवा आस्थापना 50 टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शक्यतो वर्क फ्रॉम होमचा मार्ग अवलंबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली आहे. तरी मार्केट परिसरातील गर्दी कमी होताना दिसत नाही. तसेच कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता अतिरिक्त आणि कडक निर्बंध लागू करण्याची गरज पडू शकते. दुकान, मॉल किंवा मंगल कार्यालय आदी ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त गर्दी आढळ्यास ती आस्थापना कोविड पूर्णपणे संपेपर्यंत बंद केली जाऊ शकते. फक्त दंडात्मक कारवाई करण्यापुरते मर्यादित न राहता गुन्हे दाखल करणे, सील करणे अशा पद्धतीने कारवाया केल्या जात आहेत.
-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका