Breaking News

महामुंबई क्षेत्रात कोरोनाची दुसरी लाट; आरोग्य व्यवस्थेसमोर आव्हान

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोरोना साथीचा सामना करण्यासाठी गेल्या वर्षीपासून युद्धपातळीवर काम करणार्‍या नवी मुंबई, पनवेल, आणि उरण या महामुंबई क्षेत्रांतील स्थानिक प्रशासनाला काही दिवस उसंत मिळालेली असतानाच पुन्हा सुरू झालेल्या कोरोना लाटेशी दोन हात करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेेसमोर आव्हान आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातच कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्व यंत्रणा सतर्क झाली असून एकीकडे लसीकरण आणि दुसरीकडे कोरोना रुग्णांची काळजी अशा दुहेरी पातळीवर ही प्रशासने कार्यरत आहेत. नवी मुंबई व पनवेल पालिका आणि उरण नगरपालिकेवर सिडको या महामंडळाचा वरदहस्त असून सिडकोने नवी मुंबईसाठी वाशी येथील भव्य प्रदर्शन केंद्र मोफत दिले आहे. पालिकेने या ठिकाणी राज्यातील एक अद्ययावत व सुसज्ज असे कोविड काळजी केंद्र उभारलेले आहे. नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात 200 रुग्णांवर उपचार होणार असून यातील 80 रुग्णांसाठी अत्यवस्थ रुग्णशय्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. याशिवाय सानपाडा येथे एमजीएम रुग्णालयाचे एक तयार रुग्णालयात सर्व  वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून 75 रुग्णांवर कोणत्याही क्षणी उपचार होऊ शकणार आहेत. नवी मुंबई पालिका क्षेत्रात गेल्या वर्षी 50 हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार झालेले आहेत. शहरात कोरोना रुग्णांचे प्रसार केंद्रावर लक्ष ठेवले जात असून लसीकरण वेगात सुरू करण्यात आले आहे. पालिकेच्या सर्व रुग्णालयांबरोबरच 37 ठिकाणी हे लसीकरण केले जात आहे. याशिवाय 15 खासगी रुग्णालयात ही सेवा देण्यात आली आहे. त्यामुळे 40 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. कडक निर्बंध लादून पालिका या दुसर्‍या लाटेवर आरूढ होण्यासाठी तयार असून एक विशेष वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. पनवेलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. खासगी रुग्णालयाबरोबर सामंजस्य करार करून पालिका या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टरांची पूर्तता झाल्यानंतर हे रुग्णालय लवकरात लवकर सुरू केले जाणार आहे. जिल्हा रुग्णालयातही 70 रुग्णशय्या असून इतर रुग्णांसाठी 53 रुग्णशय्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. उरण नगरपालिकेसाठी जेएनपीटीचे रुग्णालय तयार असून सध्या रुग्णसंख्या कमी आहे. सिडकोच्या प्रशिक्षण केंद्राचाही कोविड काळजी केंद्रासाठी वापर केला जाणार आहे. पावणेदोन लाख लोकसंख्येच्या या छोट्या शहरात सध्या 24 रुग्ण आहेत. जेएनपीटी बंदरामुळे या ठिकाणी येणारी आवकजावक मोठी आहे. नवी मुंबई, पनवेल व उरण या महामुंबई क्षेत्रातील करोना रुग्णांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढत असून स्थानिक प्राधिकरणांनी गेल्या वर्षांच्या अनुभवावरून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, नेरुळच्या रुग्णालयात प्रयोगशाळा उभारण्यात आली. त्यामुळे कोरोनाकाळात या प्रयोगशाळेचा मोठा आधार रुग्णांना मिळाला. ही प्रयोगशाळा कोरोनानंतरही शहरासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या ठिकाणी पालिका रुग्णालयातील रुग्णांना आपल्या चाचण्यांसाठी इतर ठिकाणी खेटे मारावे लागणार नाहीत. सर्व चाचण्या या प्रयोगशाळेत मोफत होणार आहेत.

रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णालये सज्ज

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन गृह अलगीकरणातील रुग्णांवर पाळत ठेवली जात असून त्यांच्या इमारती प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. नवी मुंबई पालिकेने मास्क न वापरणार्‍या हजारो नागरिकांवर कारवाई करून एक कोटीपेक्षा जास्त दंड ठोठावला आहे. नवी मुंबईत रिलायन्स, अपोलो, एमजीएम, फोर्टिज, डी. वाय. पाटीलसारखी अद्ययावत व आधुनिक रुग्णालये मुंबईनंतर नवी मुंबईत आहे. याशिवाय 200पेक्षा जास्त खासगी रुग्णालये रुग्णांच्या सेवेसाठी तयार आहेत. त्यामुळे पहिल्या लाटेत नवी मुंबई वाढत्या रुग्णसंख्येचा सामना करू शकलेली आहे. त्याचप्रमाणे या दुसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply