खोपोली : प्रतिनिधी
कैलास सत्यार्थी चाईल्ड फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खोपोली पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची निर्मिती करण्यात आली असून, त्याचे लोकार्पण मंगळवारी (दि. 7) संध्याकाळी उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्र व राज्य बालहक्क कायदे व बाल लैंगिक अत्याचार तपास नियमाअंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची निर्मिती करण्यासाठी कैलास सत्यार्थी चाईल्ड फाउंडेशन ही सामाजिक संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून व रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्यामध्ये बालस्नेही कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या बालस्नेही कक्षात टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरे, लहान मुलांसाठी आवश्यक ती खेळणी, मनोरंजनाचे अन्य साहित्य, भिंतीवर चित्रे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहेत. खोपोली पोलीस ठाण्यातील बालस्नेही कक्षाच्या लोकार्पण कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार, फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक श्रीमंती हेमंती मॅडम, खोपोली समन्वयक दीप्ती रामराजे, बाल कल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ साळुंखे यांच्यासह अन्य सदस्य, समर्थ प्रतिष्ठानचे सदस्य जयदीप कुंभार, कमलेश कोरपे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व शहरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.