आषाढी यात्रेवर यंदाही कोरोना निर्बंध
मुंबई ः प्रतिनिधी
पंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी गुरुवार (दि. 1)पासून पालखी प्रस्थान होणार आहे. यंदाही कोरोना संसर्गामुळे यात्रा आणि पालख्यांवर निर्बंध असणार आहेत. दुसरीकडे या निर्णयाला भाजपचे आध्यात्मिक सेलचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी विरोध केला आहे.
आषाढी एकादशीला मानाच्या 10 पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार गुरुवारी देहू येथील तुकोबांच्या आणि शुक्रवारी आळंदी येथून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे प्रस्थान आहे, पण कोरोना निर्बंधामुळे पालख्यांचा फक्त प्रस्थान सोहळा होईल. त्यानंतर पादुका मंदिरातच विसावतील. आषाढीच्या आधी त्या एसटीने पंढरपूरकडे रवाना होतील, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
दरम्यान, पालखी एसटीतून नेण्यास भाजपने कडाडून विरोध केला आहे. भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी पायी वारी होणार म्हणजे होणारच, असे आव्हान ठाकरे सरकारला दिले आहे. मायबाप वारकर्यांनी शेवटपर्यंत सरकारच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहिली, पण सत्तेच्या नशेत गुंग झालेल्या सरकारने वारकर्यांच्या परंपरेला आणि भावनेला साफ धूडकावले. यापुढे होणार्या सर्व परिणामांना फक्त आणि फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असतील. सविनय कायदेभंग काय असतो ते इंग्रजांनंतर या जुलमी सरकारला लवकरच दिसेल, असेही भोसले यांनी म्हटले आहे.