Breaking News

पर्यावरणपूरक विकास

माथेरान शहर आणि परिसरातील डोंगररांगा या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर केल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाला बाधा करणारी कोणत्याही प्रकारांची कामे माथेरानमध्ये केली जात नाहीत. माथेरान गिरिस्थान नगर परिषददेखील पर्यावरणपूरक विकासकामे व्हावीत यासाठी पुढाकार घेत आहे. माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात आले पाहिजेत यासाठी मुंबईला महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून माथेरानमधील पायाभूत सुविधांचे जाळे उभे करण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न सुरु सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरीनाका येथील वाहनतळ परिसराचे एमएमआरडीएच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात येत आहे. दस्तुरीनाका येथे एमएमआरडीएने आता सुसज्ज वाहनतळ उभारले आहे. तेथे आता नियोजन करून वाहने उभी करण्यास सुरुवात झाली आहे. दस्तुरीनाका परिसरातील वृक्षांना दगडी चौथरे बांधण्यात येत आहेत. एन्ट्री गेटची पर्यावरणपूरक कमानदेखील आकर्षक बनवली जात आहे. तेथील रस्ते मातीपासून बनवलेल्या पेव्हरब्लॉकने सुशोभीत करण्यात येत आहेत.

माथेरानचे हार्ट समाजाला जाणारा पॅनोरमा पॉईंटवर गेल्या काही वर्षात पर्यटक फिरकत नव्हते. तेथील रस्ता खड्ड्यात हरवला होता. पॅनोरमा पॉईंटवरून मुंबईपासून पुण्यापर्यंतचा परिसर न्याहाळता येत असल्याने या प्रेक्षणीय स्थळाचे सुशोभीकरण करण्यावर लक्ष दिले. या पॉईंटकडे जाणार्‍या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात या रस्त्यावरून ई रिक्षा धावू शकते.

ऐतिहासिक महत्व लक्षात घेता मायरा पॉईंटचे सुशोभीकरण करण्यासाठी माथेरान नगर परिषद आग्रही होती. एमएमआरडीएने मायरा पॉईंटच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेऊन तेथे पर्यावरणपूरक विकास साधला आहे. मायरा पॉईंट हा परिसर शहरातील इंदिरा गांधी नगरासाठी रोजगाराचे प्रमुख साधन असल्याने त्या पॉईंटच्या सुशोभीकरण पर्यटन वाढीसाठी मदतगार ठरू शकते. माथेरानचे हार्ट पॉईंट सुशोभीत करण्यात येत आहे. आता हार्ट पॉईंटवर जाण्यासाठी रस्ता तयार झाला आहे, त्याला रेलिंगही बसविण्यात आले आहेत.

माथेरानचा मुख्य रस्ता म्हणून महात्मा गांधी रस्ता ओळखला जातो. दस्तुरी ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशा एकूण पाच किमी लांबीच्या या रस्त्याचे काम एमएमआरडीए मार्फत केले जात आहे. हा रस्ता धूळविरहित आणि पर्यावरण पूरक बनविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे प्रामुख्याने व्यापारी बंधूंच्या दुकानात जाणारी धूळ थांबणार आहे आणि त्यातून मालदेखील खराब होणार नाही. या रस्त्यावरील गटारे अनेक ठिकाणी फुटली होती. एमएमआरडीएने एकसारखी आणि पर्यावरण पूरक गटारे बांधण्याच्या कामाचे नियोजन केले आहे.

शहरातील शास्त्री हॉल येथे हुतात्मा स्मारकाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हुतात्मा भाई कोतवाल यांच्याबाबत माथेरानकरांच्या मनात असलेली भावना जतन करीत या वास्तूचे सुशोभीकरण केले जात आहे. शहरात ऐतिहासिक वास्तूंमध्ये असलेल्या वाचनालयाच्या इमारतीच्या आजूबाजूला पर्यावरण पूरक बगीचा फुलविला जात आहे. माथेरानमध्ये येणारे पर्यटक हा केंद्रबिंदू ठेवून, या पॉइंटवर काही दगडी बाकडे बनविले जात आहेत. शहरातील वखारीचा नाका सुशोभीत केला जात असून, छोटुभाई पानवाला नाका येथे कारंजे विकसीत करण्यात आले आहे. दस्तुरी परिसराचे वीर जिवा महाले चौक तर टपाल पेटी परिसराचे वंदनीय अहिल्याबाई होळकर चौक असे नामकरण करण्यात आले आहे.

पर्यावरणपूरक कामांमधील महत्वाचे काम म्हणजे कॉन्व्हेंट स्कुलला जाणारा ओबडधोबड आणि तीव्र उताराचा रस्ता, आता जांभा दगडांचा एकसंध रस्ता  झाला आहे. मुख्य पॉईंट, ओलिम्पिया मैदान तसेच इतर आवश्यक ठिकाणी आणि मुख्य बाजारपेठेत महिला व पुरुषांसाठी सुलभ शौचालये बांधली आहेत. ओलिम्पिया येथे प्रेक्षकांसाठी चांगल्या प्रतीच्या खुर्च्या बसविल्या आहेत. तेथे सध्या विविध विकासकामे सुरू आहेत.पर्यटकांना घोड्यावरून उतरण्यासाठी माथेरानमधील  प्रत्येक पॉइंटला घोडा स्टॅण्ड उभारण्यात आले आहेत. 

शहरात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करणे तसेच रस्ते किंवा अन्य विकास कामे पुर्वी माथेरान सनियंत्रण समितीमुळे थांबून राहायची. मात्र नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी आपल्या सर्व सहकार्‍यांना एकत्र करून सनियंत्रण समितीची परवानगी घेऊन सर्व कामे सुरु केली आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये पर्यावरण विकास साधण्यात आता अडचणी उभ्या राहत नसल्याचे दिसून येत आहे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply