मुरूड : प्रतिनिधी
ओकिनावा शोरीन-रियु क्यूडोकान कराटे डो ऐरोली (नवी मुंबई) शाखेच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत निशांत प्रदीप डाकूआ हा यशस्वी झाला. त्यामुळे त्याला मानाचा ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला.
ऐरोलीतील संत सावता भवनात नुकत्याच झालेल्या या परीक्षेत भारताचे मुख्य प्रशिक्षक अरुण बोडके यांनी परीक्षण केले. निशांत हा नवी मुंबईचे मुख्य प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय पदक विजेते प्रसाद चौलकर यांच्याकडे गेली पाच वर्षे प्रशिक्षण घेत आहे. निशांतने अनेक जिल्हा, राज्य स्पर्धांमध्ये भाग घेऊन पदके मिळवली आहेत. अतिशय मेहनतीने आणि जिद्दीने ब्लॅक बेल्टपर्यंतचा प्रवास त्याने यशस्वीपणे पूर्ण केला.
रायगडचे मुख्य प्रशिक्षक अरविंद भोपी यांचे सहकार्य निशांतला लाभले, तसेच ऐरोली येथील सहाय्यक प्रशिक्षक कौस्तुभ कोल्हे आणि कविश चौहान यांनीही निशांतच्या सरावादरम्यान मेहनत घेतली. मानाचा ब्लॅक बेल्ट मिळवणार्या निशांतचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन होत आहे.