रायगड जिल्ह्याला 320 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. सागर किनारी असलेल्या नारळ, सुपारीच्या बागा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतात. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेगार, हरिहरेश्वर, बागमांडला, मुरुड तालुक्यातील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला, काशीद समुद्र किनारा, अलिबाग येथील कुलाबा किल्ला, किहीम बीच अशी अनेक ठिकाणे पर्यटकांना नेहमीच खुणावत असतात. त्यामुळे रायगड जिल्ह्यात फक्त शनिवार व रविवार या दोन दिवसात लाखापेक्षा जास्त पर्यटक येऊन जात असतात. संचारबंदी व लॉकडाऊनमुळे या पर्यटनस्थळांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, शेकडो स्थानिक बेरोजगार झाले आहेत. त्यांना घरातच बसून रहावे लागत असल्याने अशा लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुरूड हा पर्यटन तालुका असून या ठिकाणी गेल्या दोन वर्षात संचारबंदी व लॉकडाऊनमुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मुरूड तालुका मुंबईपासून 154 किलोमीटर अंतरावर असल्याने मुंबई, ठाणे, विरार, कल्याण, डोंबिवली, बोरिवली, पनवेल आदी ठिकाणाहून दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. मुरुड तालुक्यातील काशीद व मुरुड समुद्र किनारा, ऐतिहासिक जंजिरा किल्ला. पद्मदुर्ग किल्ला, फणसाड अभयारण्य, नवाबकालीन गारंबी धरण अशी महत्वाची प्रेक्षणीय स्थळे आहेत. या ठिकाणांना भेट देण्यासाठी दरवर्षी सहा लाखापेक्षा जास्त पर्यटक येथे येत असतात. शनिवार, रविवार तर मुरुड हे नेहमी गजबजलेले असायचे. परंतु दोन वर्षांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने सातत्याने संचारबंदी व लॉकडाऊनमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने सध्या 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्याने पर्यटक आता इकडे फिरेनासे झाले आहेत. मागील वर्षी लॉकडाऊन तर आता राज्य शासनाचा लॉकडाऊन, त्यामुळे पर्यटकांवर निर्भर असलेल्या मुरूड तालुक्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. हॉटेल, लॉजिंग सुनेसुने झाले आहे. घोडागाडी व्यवसाय करणारे, वॉटर स्पोर्टस सर्वजण घरात बसून असून, ते लॉकडाऊन संपण्याची वाट पहात आहेत. एकेकाळी पर्यटकांची वर्दळ असणारा मुरूड तालुका आता मात्र खूप सुनासुनासा वाटत असून, सर्वच घटकांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.ऐतिहासिक जंजिरा किल्ला पहाण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी पहावयास मिळायची, सलग सुट्ट्यांमध्ये जंजिरा किल्ला पहाण्यासाठी एका दिवसात 25 हजारपेक्षा जास्त पर्यटक आलेले पहायला मिळाले आहेत. परंतु सध्या येथे कुणीच फिरकत नसल्याने येथील शिडांच्या बोटी, मशिनवाल्या बोटी किनार्याला साकारण्यात आलेल्या आहेत. जंजिरा किल्ल्यापासून सुमारे 250 लोकांना रोजगार मिळत होता, आता हा व्यवसाय पूर्णतः बंद झाल्याने त्यावर अवलंबून असणारे लोक फार चिंतेत दिसत आहेत. जंजिरा किल्ल्याचा बाजूला असणारी टोपी, गॉगल्स, शहाळे विक्रेते, चहाच्या टपर्या, सरबत स्टॉल बंद झाल्याने या लोकांचासुद्धा रोजगार बुडाला आहे. सलग दोन वर्ष आणि तेही ऐन हंगामात लॉकडाऊन झाल्याने येथील लोक मेटाकुटीस आले असून, लॉकडाऊन नकोच अशी मागणी करीत आहेत. मात्र राज्य शासनाच्या निर्बंधांपुढे ते हतबल झाले आहेत. मुरुड तालुक्यातील बहुतांशी लोकांनी बँक लोन घेऊन आपली हॉटेल्स अथवा लॉजिंग थाटली आहेत. बँकेचे व्याज व हप्ता भरताना मोठी दमछाकसुद्धा होत आहे. संचारबंदी व लॉकडाऊनमुळे ते मोठ्या आर्थिक समस्येत सापडले आहेत. किनारपट्टीवरील सर्वच व्यावसायिकांना मार्च ते 15 जूनपर्यंत हा सुगीचा कालावधी असतो. मात्र कोरोना प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर 1 मार्च पूर्वीच पुणे, मुंबई येथे रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आल्याने आणि पुन्हा लॉकडाऊन झाला तर विनाकारण अडकून पडू, या भीतीमुळे लोकांनी घराबाहेर न पडण्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. तर टीव्ही चॅनेलवरील बातम्यांवर महाराष्ट्रात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे आकडे दाखवले जात असल्याने पर्यटकांच्या मनात भीतीने घर केले आहे. सुरक्षित राहण्यासाठी पर्यटकांनी बाहेर न पडण्याचे ठरवल्याने पर्यटन स्थळांवर होणारी मोठी गर्दी या वेळी ओसरली आहे. परिणामी पर्यटन व्यवसायाला ब्रेक लागल्याची स्थिती पहावयास मिळत आहे. पर्यटकच न फिरकल्यामुळे समुद्र किनारी असणारे वॉटर स्पोर्टस, घोडा गाडी, उंट सफर, बोटींग व्यवसाय थंड पडले आहेत. मागील दोन वर्षांपासून संचारबंदी व लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद राहिल्याने त्यावर अवलंबून असणारे लोक भयग्रस्त झाले असून त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पर्यटकांनी फुलणार्या मुरूड तालुक्यात सध्या एकही पर्यटक दिसत नाही. सर्व समुद्र किनारे सुनेसुने झाले आहेत. दूरवर नजर टाकली तरीसुद्धा पर्यटक दिसत नाहीत. सातत्याने होणार्या लॉकडाऊनमुळे येथे पर्यटक येईनासे झाले आहेत.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …