अलिबाग : प्रतिनिधी
राज्यात अनंतचतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता झाली असली तरी रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 24) साखर चौथीच्या म्हणजेच गौरा गणपतींचे आगमन झाले. दीड दिवसांच्या मुक्कामानंतर शनिवारी (दि. 25) या गणपतीना निरोप दिला जाईल.
गौरा गणपातीची प्रथा फक्त रायगड जिल्ह्यातच आहे. रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात हा साखरचौथ गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीनंतर येणार्या पहिल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. याला गौरा गणपती असेही म्हटले जाते. रायगड जिल्ह्यात पेण, पनवेल, उरण, कर्जत, अलिबाग या तालुक्यांमध्ये हा उत्सव साजरा केला जात असे आता दक्षिण रायगडातदेखील हा उत्सव साजरा केला जाऊ लागला आहे.
पितृपक्षात साजरा होणारा हा एकमेव उत्सव आहे. घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन्ही स्वरूपात हा उत्सव साजरा होतो. यावर्षी 731 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणेश चतुर्थीला आलेल्या 21 दिवसांच्या गणपतींचा काही ठिकाणी अजनूही मुक्काम आहे. असे असतानाच शुक्रवारी या गौरा गणपतींचे आगमन झाले.
गौरा गणेशोत्सव कसा सुरू झाला याचा नेमका उल्लेख सापडत नाही. परंतु त्याबाबत काही आख्यायिका सांगितल्या जातात. गणेश कार्यशाळामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवसापर्यंत काम चालत असते. त्यामुळे या कारागीरांना गणेशोत्सव साजरा करता येत नाही. म्हणून साखर चौथीच्या गणेशोत्सवाला सुरूवात झाल्याचे काहीजण सांगतात.
काहीच्या मते कोकणात घरगुती गणेशोत्सव साजरा होत असतो. तेथील भक्तांना सार्वजनिक गणेशोत्सवाचा आनंद लुटता येत नाही. ही संधी सर्वांना मिळावी या हेतूने या उत्सवाची सुरूवात झाली.
नांदगाव हायस्कूलमध्ये पंचक्रोशीच्या राजाचे स्वागत
मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यातील नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयात शुक्रवारी (दि. 24) पंचक्रोशीच्या राजाचे आगमन झाले. या वेळी साखर चौथ गणपतीचे हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले.
गणरायांच्या पुजेचा मान विद्यालयाचे प्रयोगशाळा सहाय्यक संतोष बुल्लू व त्यांच्या पत्नीला मिळाला. शैलेश जोशी यांनी पौरोहित्य केले. मुख्याध्यापक चिंतामणी जोशी, पर्यवेक्षक उत्तमराव वाघमोडे, प्रतीक पेडणेकर, सागर राऊत, दत्तात्रेय खुळपे, अर्चना खोत, रेखा बोरजी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आरती व भजनाचे कार्यक्रम झाले. या वेळी कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्यात आले.